26.6 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

TVS Raider आणि Hero Xtreme-125R सोबत स्पर्धा

Bajaj Pulsar N125 भारतात लॉन्च होण्यापूर्वीच समोर...

भारताची ४६ धावांत दाणादाण, प्रथम फलंदाजीचा निर्णय अंगलट

या अगोदरच्या बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत षटकामागे ८.२२ च्या...

प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, वयाच्या ६९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

ज्येष्ठ बंगाली अभिनेते आणि लोकप्रिय वाचक देवराज...
HomeRatnagiriकंत्राटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांचा महावितरण कार्यालयात हंगामा

कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर संतप्त नागरिकांचा महावितरण कार्यालयात हंगामा

तुटलेली वायर जोडताना शॉक लागून मृत्यू झालेल्या तरूणाची जबाबदारी घेण्यास ठेकेदार कंपनीने नकार दिल्याने शिवसैनिकांसह ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयात हंगामा केला. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते देखील सहभागी झाले होते. २५ लाखांची मदत द्या अन्यथा तुम्हाला इथे काम करू देणार नाही असा इशाराच शिवसैनिकांनी दिल्याने महावितरण अधिकाऱ्यांसह ठेकेदाराने पाठवलेल्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडाली. अखेरीस वाढती आक्रमकता पाहून मृत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना २५ लाखाची मदत देण्याचे आश्वासन दिल्याने २४ तासानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला.

महावितरणने ऑल सर्व्हिसेस ग्लोबल प्रा. लि. मुंबई यांना कंत्राटी कर्मचारी पुरवण्याचा ठेका दिला आहे. या कंपनीमध्ये कुंदन दिनेश शिंदे (वय २१, रा. फणसवळे, भावेवाडी, रत्नागिरी) हा तरूण काम ाला होता. सोमवारी दुपारच्या सुमारास निवखोल परिसरात तुटलेली विद्युत वाहिनी जोडताना कुंदन याचा शॉक लागून मृत्यू झाला. ठेकेदाराने सेफ्टी कीट पुरवले नाही. त्यामुळेच ही दुर्घटना घडली असा आरोप नातेवाईकांसह इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला होता.

मृतदेह ताब्यात घेण्यास नकार – सोमवारी दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली. कुंदन याच्या मृत्यूला ठेकेदाराच जबाबदार आहे असा आरोप करीत नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. जिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह फ्रिजरमध्ये ठेवण्यात आला होता. काही झाले तरी मृतदेह ताब्यात घेणार नाही असा आक्रमक पवित्रा स्थानिक ग्रामस्थांनी घेतला.

संतप्त पडसाद – मंगळवारी सकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्हा रूग्णालयात दाखल झाले. यावेळी स्थानिक ग्रामस्थ व कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते. महावितरणचे अधिकारी जिल्हा रूग्णालयात आले होते. या अधिकाऱ्यांना संतप्त जमावाने घेराव घातला होता.

वातावरण तापले – महावितरणचा हलगर्जीपणा आणि ठेकेदाराची अक्षम्य चूक यामुळेच एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला. या विरोधात धात संतप्त प्रतिक्रीया उमटत असतानाच ठेकेदाराकडून अधिकृतरित्या जबाबदारी घेणारी व्यक्ती न आल्याने वातावरण कमालीचे पेटले होते.

एकेकाला चोपून काढू – तरूणाने जीव गमावल्याने त्या तरूणाच्या कुटुंबाला मदत मिळावी तसेच यापूर्वी जे अपघात घडले आहेत त्यातील पिडीत कुटुंबाला तात्काळ मदत द्या तसेच ठेकेदाराला आमच्या समोर उभे करा. स्थानिक तरूणांचा जीव धोक्यात घालणार असाल तर एकेकाला चोपून काढू, असा इशाराच महावितरणच्या अधिकाऱ्यांना उपस्थितांमधील काही जणांनी दिला.

पोलीस गाडीतून आणले – ज्या कंपनीला हा ठेका दिला आहे त्या कंपनीचे काही अधिकारी रत्नागिरीत आले. त्यांना पोलीस गाडीतून जिल्हा रूग्णालयात आणले. ठेकेदाराची माणसे पोलिसांच्या गाडीत आहेत हे समजल्यानंतर संतप्त जमावाने गाडीकडे धाव घेतली आणि त्या अधिकाऱ्यांना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांचे काय करायचे ते बघून घेऊ अशी भूमिका जमावाने घेतली.

महावितरण कार्यालयात हंगामा – जिल्हा रूग्णालयातून सर्व लवाजमा महावितरण कार्यालयात पोहोचला. अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात जावून जमावाने एकच हंगामा केला. तरूणाच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा प्रश्न करून आम्हाला लेखी मदतीची हमी द्या, अशी भूमिकाच साऱ्यांनी घेतली.

अधिकारी धारेवर – महावितरण कार्यालयात गोंधळ सुरू असतानाच काही अधिकारी मध्ये मध्ये लुडबूड करू लागले. त्यावरुन शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, उदय बने, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, संजय पुनसकर, भाजपचे विवेक सुर्वे, उमेश देसाई, अॅड, महेंद्र मांडवकर आदी आक्रमक झाले. लुडबूड करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलेच धारेवर धरले.

फौजफाटा मागवला – प्रकरण हाताबाहेर जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आणि पोलिसांनी तात्काळ जादा फौजफाटा बोलावून घेतला. महावितरण कार्यालयाला अक्षरशः छावणीचे रूप आले होते. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात झाल्याने महावितरण कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना धडकीच भरली.

घूमजाव केले – अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात हंगामा सुरू असतानाच मयत कुंदन शिंदे या तरूणाच्या कुटुंबाला नुकसान भरपाईपोटी २५ लाख रूपयांची मदत द्यावी व ते. लेखी लिहून द्या असे सांगितल्यानंतर सुरूवातीला महावितरणसह ठेकेदार कंपनीकडून आलेल्या अधिकाऱ्यांनी लिहून देण्यास होकार दिला व त्यानंतर शब्द पालटल्याने पुन्हा दालनात गोंधळ सुरू झाला.

प्रशासनाला नमवले – परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्हे निर्माण झाली होती. पोलिसांनी महावितरण अधिकाऱ्यांना सूचना केल्या व तुमच्या अखत्यारीत जेवढे येतेय तेवढे लेखी द्या असे सांगितल्यानंतर महावितरणसह ऑल सर्व्हिसेस ग्लोबल प्रा. लि. मुंबई यांच्याकडून मदतीकरीता लेखी देण्यात आले. अशी माहिती शिवसैनिकांनी नंतर पत्रकारांना दिली.

तर कर्मचारी काम करणार नाहीत – कंत्राटी कर्मचारी हे स्थानिक आहेत. कोणतेही कर्मचारी असोत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महावितरणसह संबंधित ठेकेदार कंपनीची आहे. आजपासून सुरक्षेसाठी उपकरणे न पुरवल्यास एकही कर्मचारी लाईनवर काम करणार नाही, असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला.

तातडीची मदत मिळणार – अधीक्षक अभियंता यांनी आपल्या सहीनिशी पत्र बैठकीच्या इतिवृत्तांतात लिहून दिले आहे. त्यामध्ये प्रशासकीय परिपत्रक क्र. ६६८ दि. १४/३/२०२४ अन्वये कंपनीमध्ये बाह्य स्त्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीवर कार्यरत कंत्राटी कामगाराचा प्राणांतिक अपघात झाल्यास वारसाला ४ लाख इतकी तातडीची आर्थिक मदत करण्यात येईल असे लेखी लिहून दिले आहे तसेच संबंधित ठेकेदाराकडून २५ लाखाची मदत देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे.

मृतदेह ताब्यात घेतला – घटनेला गेले २४ तास उलटून गेले तरी मृतदेह जिल्हा रूग्णालयात होता. जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतल्याने पोलिसांसमोर देखील प्रश्न निर्माण झाला होता. लेखी आश्वासनानंतर मंगळवारी सायंकाळी उशीरा कुंदन शिंदे याचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.

RELATED ARTICLES

Most Popular