चिपळूण शहरातील अत्यंत महत्त्वाचा आणि वाहतुकीवर उत्तम पर्याय ठरणारा पेठमाप-मुरादपूर पुलाच्या कामाने पावसाळ्यानंतर पुन्हा एकदा गती घेतली आहे. या पुलाचे मार्चपूर्वी जास्तीत जास्त काम मार्गी लावण्यासाठी ठेकेदार कंपनीकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत. पिलरवर गर्डर चढविण्याचे कामही आता अंतिम टप्प्यात आले आहे. चिपळूण शहरातील पेठमाप आणि मुरादपूर हे ‘दोन मोठी लोकवस्ती असणारे भाग वाशिष्ठी नदीमुळे विभागले आहेत. इंग्रजांच्या काळात येथे फरशी बांधण्यात आली होती. ओहटीच्यावेळी या फरशीवरून वाहतूक केली जात होती.
आता देखील काही प्रमाणात ती फरशी अस्तित्वात असून त्यावरून हलकी वाहने ये-जा करतात. परंतु भरतीच्या वेळी तसेच पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहामुळे येथील वाहतूक तसेच येण्या-जाण्याचा मार्ग देखील बंद पडतो. साहजिक परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे येथे पूल व्हावा अशी मागणी नागरिक कित्येक वर्ष करत होते. या मागणीची दखल घेत आमदार शेखर निकम यांनी मुरादपूर-पेठमाप असा पूल शासनाकडून मंजूर करून घेतला. त्यासाठी सुमारे १२ कोटी रुपये शासनाने मंजूर केले आहेत. गेल्या काही वर्षांपासून या पुलाचे काम सुरु आहे. पावसाळ्यापूर्वी १४ पिलरचे काम पूर्ण करण्यात आले होते..
त्यानंतर अत्ता पावसाचा जोर कमी होताच पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. आता पुलाचे गर्डर चढविण्याचे अंतिम काम सुरु आहे. हे कामही लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. गर्डरचे काम पूर्ण होताच पुलावरील उर्वरित स्लॅबचे व रेलिंगचे काम हाती घेतले जाणार आहे. या पुलावर एकूण ६० गर्डर चढविले जाणार आहेत. आतापर्यंत ४६ गर्डर चढविण्यात आले आहेत. उर्वरित कामही तातडीने मार्गी लावले जाणार आहे. या कामावर आमदार शेखर निकम यांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून या कामाचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांमध्ये पुलाचे काम पूर्ण होऊन पूले वाहतुकीसाठी खुला होईल, असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.