शहरातील बहादूरशेख नाका येथे उड्डाणपुलाच्या उभारणीत पिलरसाठी खोदकाम काम सुरू आहे. अजस्त्र यंत्रसामग्रीने जुने पिलर तोडून नवीन पिलरसाठी सुरू असलेल्या खोदकामामुळे परिसरात मोठा आवाज होत आहे. नागरिकांना सिमेंटच्या धुळीचा सामना करावा लागत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बहादूरशेख नाका परिसरात नव्या डिझाईननुसार उड्डाणपुलासाठी पिलर उभारले जात आहे. यापूर्वी उभारलेले पिलर तोडले जात आहेत. जुने पिलर तोडण्यासाठी आणि नवीन पिलरच्या खोदकामासाठी भलेमोठे कॉम्बो क्रशर, कटर मशीन, रॉक ब्रेकर, क्रेन अशा अजस्त्र यंत्रसामग्रीचा वापर होत असल्याने शेजारी असणाऱ्या नागरिकांना मशीनच्या आवाजाचा सामना करावा लागत आहे. तसेच पूल तोडताना मोठ्या प्रमाणात मलबा खाली आदळत असल्याने त्यातून सतत निघणाऱ्या सिमेंटच्या धुळीमुळे अनेकांना श्वास घेण्यास कोंडी होत आहे. मशीनच्या आवाजाने नागरिक त्रस्त झाले आहेत.
येथे दिवसरात्र अजस्त्र यंत्रसामग्रीने काम सुरू असल्यामुळे त्याचा मोठा आवाज होतो. महामार्गावरून दिवसा वाहने सुरू असतात. काहीवेळा वाहनांच्या आवाजामुळे यंत्राच्या आवाजाचा फारसा परिणाम जाणवत नाही; मात्र ब्रेकर लावल्यानंतर आणि खोदाई करताना होणाऱ्या आवाजाचा त्रास नागरिकांना होत आहे तसेच रात्री महामार्गावरील वाहतूक मंदावते तेव्हा अजस्त्र यंत्रसामग्रीचा आवाज आणखी प्रकर्षाने जाणवतो. त्यामुळे नागरिकांची झोपमोड होते. महामार्गालगत राहणाऱ्या नागरिकांना हा त्रास जाणवू लागला आहे. बहादूरशेख नाका चौकातील रिक्षा व्यावसायिक, हॉटेल आणि छोटे-मोठे व्यावसायिक या आवाजामुळे त्रस्त झाले आहेत.