रत्नागिरी शहराचा गेल्या २० वर्षांमध्ये चांगलाच विस्तार झाला आहे. आजूबाजूच्या परिसराचा मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. निवासी, व्यापारी इमले, संकुलांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ही संख्या आता ३० हजारांकडे गेली आहे. त्या तुलनेत पायाभूत सुविधाही विकसित केल्या जात आहे. भविष्यात २५ ते ३० वर्षांचा विचार करून शहराचा आराखडा तयार केला जात आहे. एकीकडे शहराचा चेहरामोहरा बदलत असताना मोठी उणीव भासते ती वाहन पार्किंगची. वाहनं ही माणसांची गरज बनली आहे. दळणवळणाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत; परंतु या सर्वांचा सारासार विचार केला तर रत्नागिरी शहराच्या मुख्य बाजारपेठेत कमालीची सुधारणा झाली व हळूहळू विस्तार होत आहे. बाजारपेठ वाढत चालली आहे; परंतु त्या तुलनेत पार्किंगची सोय पालिकेकडून करण्यात आलेली नाही. पार्किंगसाठी शहरामध्ये जवळपास २० आरक्षित जागा आहेत; परंतु गेल्या २० वर्षांमध्ये त्यापैकी दोन-चार जागाच विकसित झाल्या आहेत.
सण, उत्सवाला समस्या – गणेशोत्सव, आषाढी एकादशी, शिमगोत्सव, दिवाळी, दसरा, पडवा, दहीहंडी आदी सणासुदींसाठी शहरात मोठ्या प्रमाणात लोकं खरेदीला किंवा फिरायला येतात. तेव्हा प्रामुख्याने ही समस्या जाणवते. पालिकेने शहरामध्ये गेल्या २० वर्षांमध्ये फक्त आठवडा बाजार, मारुती मंदिर, पोस्ट ऑफिससमोर, रामआळी, कलेक्टर कंपाउंड, एसपी ऑफिस या ठिकाणी पार्किंग व्यवस्था आहे. मुख्य रस्त्याच्या बाजूला दुचाकीसाठी पार्किंग आहे. ते स्थानिक लोकांच्या गाड्यांनीच फुल्ल होते. खरेदी किंवा फिरायला येणाऱ्यांना वाहने लावण्यासाठी पार्किंगच मिळत नाही. या समस्येचा परिणाम थेट बाजारपेठेवर होत असून, अनेक ग्राहक प्रशस्त पार्किंग असलेल्या मॉल किंवा अपना बाजारात खरेदीसाठी जाणे पसंत करत आहेत.
प्रमुख ठिकाणी पार्किंगचा अभाव – रत्नागिरी शहरातील नाचणे, मिरजोळे एमआयडीसी, राममंदिर रोड, साळवीस्टॉप, थिबा पॅलेस, जुना बसस्टँड परिसर, जयस्तंभ चौक या ठिकाणी वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना पार्किंगची सोय अपुरी आहे. अनेक ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अनधिकृतपणे वाहने लावली जात असल्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो आणि अपघातांची शक्यता वाढते. शहरात सर्वत्र नो पार्किंगचे बोर्ड आहेत; परंतु पार्किंगसाठीचे बोर्ड दिसत नाहीत. त्यामुळे पार्किंगसाठीचे भूखंड विकसित करण्याची गरज आहे.
पार्किंग नसल्याने वाहतूककोंडी – पालिकेचे जेमतेम पार्किंग प्लॉट आहेत ते आधीच फुल्ल झालेले असतात. परिणामी, पार्किंग जागा नसल्याने अनेक वाहनधारक गाड्या रिकाम्या जागांमध्ये किंवा रस्त्याच्या कडेला उभी करतात. आधीच रस्त्यामध्ये फळ, भाजीपाला विक्रेते बसलेले असतात. त्यापुढे वाहने लागतात. अर्धा रस्ता त्याने व्यापतो आणि वाहतूककोंडी निर्माण होते. त्यामुळे वाहतूक पोलिस आणि पालिकेने हॉकर्स झोन तयार करून दिले तरच ही कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
कारवाईमध्येच अधिक रस – एकीकडे वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी वाहतूक शाखेकडून जोरदार दंडात्मक कारवाई सुरू आहे. पार्किंगचे अनेक प्लॉट आरक्षित आहेत; मात्र त्यांचा विकास झालेला नाही. त्यामुळे नो पार्किंगची कारवाई होते; परंतु पार्किंगसाठी कुठे जागा आहे है दाखवणारी कोणतीच यंत्रणा कार्यरत नाही. वाहतूक कोंडी सोडवण्यापेक्षा पोलिसांना कारवाईतच रस असल्याचे दिसते. त्यामुळे मुख्य उद्देश बाजूला राहून शहरातील वाहतुकीवर त्याचा परिणाम होत आहे.
तज्ज्ञांचे मते अन् उपाययोजना? – शहर नियोजन तज्ज्ञांच्या मर्ने, रत्नागिरीसारख्या शहरात ‘मल्टीलेव्हल पार्किंग’, ‘पेडपार्किंग झोन्स’ तसेच ‘वनवे ट्रैफिक सिस्टिम’ लागू करणे गरजेचे आहे.