25.6 C
Ratnagiri
Monday, September 16, 2024
HomeRatnagiriसिव्हीलमध्ये कुणी डॉक्टर्स 'काढा ढोसून' उपचार करणार असतील तर गरीब जनतेला वाली कोण?

सिव्हीलमध्ये कुणी डॉक्टर्स ‘काढा ढोसून’ उपचार करणार असतील तर गरीब जनतेला वाली कोण?

डॉक्टर महोदय सिव्हील हॉस्पिटलच्या कंपाऊंडमध्ये आले, ते गाडीतून उतरतानाच लटपटत होते.

रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये जे काही चालू आहे त्याची आजवर केवळ सिव्हील हॉस्पिटल परिसरात चर्चा होती, परंतु युवतीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी संतप्त जनतेने सिव्हील हॉस्पिटल परिसरात जेव्हा आंदोलन केले तेव्हा मात्र ‘सारा मामला’ खुलेआम जनतेसमोर आला… आजवर ‘हळूहळू बोंबला’ असे सुरु होते, परंतु आता मात्र त्याचा पुरा ‘बोभाटा’ झाला… सिव्हील हॉस्पिटलमध्ये जे काही चालू आहे ते भयावह असेच म्हणावे लागेल… दुर्दैव म्हणजे ज्यांनी त्याला कठोरपणा आळा घालावयाचा तेच त्यावर ‘पांघरुण’ घालू पहात आहेत हे प्रजेचे दुर्दैव होय ! रत्नागिरीतील सिव्हील हॉस्पिटलमध्ये जो भयावह प्रकार सुरु आहे त्याची चर्चा आता जनतेत खुलेआम सुरु झाली आहे.

‘काढा’ घेऊन येतात – सिव्हील हॉस्पिटलमधील काही मोजकेच डॉक्टर्स काहीतरी ‘काढा’ प्राशन करुन येतात अशी मागील अनेक दिवसांपासून सिव्हील हॉस्पिटल परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. सिव्हील हॉस्पिटलशी संबंधित काही मंडळी हे सर्व बाहेर येऊन नागरिकांना सांगत असतात.

आणि बोभाटा झाला! – अशातच रत्नागिरीतील एका युवतीवर अत्याचाराचे प्रकरण घडले आणि संतप्त नागरिक सिव्हील हॉस्पिटल परिसरात जाऊन धडकले. नागरिक विलक्षण संतापले होते. ते नीच कृत्य करणाऱ्याला फाशी द्या अशी मागणी करीत होते. याचवेळी सिव्हील हॉस्पिटलमध्ये जे काही सुरु आहे त्याची चर्चा थेट जनतेपर्यंत येऊन पोहोचली आणि मग नागरिक थक्क झाले.

‘काढा’ कोणत्या ब्रँडचा ? – रात्री उशीरापर्यंत सिव्हील हॉस्पिटल परिसरात संतप्त नागरिकांचा व पत्रकारांचा राबता होता. सिव्हील हॉस्पिटल मधील काही ‘ठराविक डॉक्टर्स’ काही ठराविक ब्रँडचा ‘काढा’ प्राशन करुन येत असल्याचे कानावर आल्याने अनेक नागरिक व पत्रकार त्याची शहानिशा करण्यासाठी थांबून राहिले.

मध्यरात्री ३ वाजता – मध्यरात्र झाली, पहाटेचे ३ वाजले आणि एका कारमधून २ डॉक्टर महोदय सिव्हील हॉस्पिटलच्या कंपाऊंडमध्ये आले. ते. गाडीतून उतरतानाच लटपटत होते, त्यांच्या झोकांड्या जात होत्या, कसाबसा तोल सावरत ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांच्या पाठोपाठ पत्रकार, प्रेस फोटोग्राफर्स व काही नागरिकही आत आले.

झोकांड्या जात होत्या – ते दोघेही मान्यवर हलत डुलत चालत होते, झोकांड्या जात होत्या, त्यांच्या तोंडातून कसलातरी उग्र दर्प ओसंडून वहात होता, त्यांना धड बोलता येत नव्हते, धड शब्द उच्चारता येत नव्हते… उपस्थित जे काही समजायचे ते सारे समजून चुकले. हे सर्व अनेक नागरिकांनी, पत्रकारांनी व प्रेस फोटोग्राफर्सनी प्रत्यक्ष पाहिले.

व्हिडीओ शुटींग – काही उपस्थितांनी त्याचे ‘व्हिडीओ शुटींग’ घेतले. व्हिडीओ शुटींग सुरु होताच एक ‘मुरब्बी’ महाशय सतर्क झाले. त्यांनी आपल्या तोंडावर ‘मास्क’ लावला, ते बोलायचे बंद झाले, खुणा करुन बोलू लागले, उपस्थित सिस्टर्सना त्यांनी केवळ हातवारे करुन काही ‘दिव्य’ सूचना दिल्या आणि आत आलेल्या नागरिक व पत्रकारांना हाताने ‘बाहेर जा’ असे खुणावले.

ते घेऊन आलेत ! – यानंतर ते हॉस्पिटलमधील पेशंटची ‘तपासणी’ करण्यासाठी पुढे गेले. त्यांचे सहकारी महोदय उपस्थितांशी बोलत राहिले. त्यांनी सांगितले, “ते घेऊन आलेत”, त्यावर उपस्थित नागरिक व पत्रकारांनी “तुम्ही कुठे गेला होता?” असे विचारले तेव्हा त्या महोदयांनी सांगितले, “मी त्यांच्यासोबत गेलो होतो, ते माझे सिनिअर आहेत, त्यांनी बोलवल्याने त्यांचेसोबत गेलो”.

सीसी टीव्हीचे रेकॉर्ड – हे सर्व नागरिकांनी काढलेल्या व्हिडीओमध्ये रेकॉर्ड झालेले असून सिव्हील हॉस्पिटलच्या सीसीटीव्हीमध्ये देखील रेकॉर्ड झालेले असणार. मात्र बदलापूर येथील ‘त्या’ शाळेने सीसी टीव्हीचे रेकॉर्ड ‘डिलीट’ केले असे आता तपासात निष्पन्न झाले आहे, तसा प्रकार घडल्यास सीसी टीव्हीचे रेकॉर्ड मिळणे मुश्कील होईल.

पेशंटस्ची तपासणी! – ते दुसरे महाशय उपस्थितांना सांगत होते की येथे ‘व्हिडीओ शुटींग’ घेण्यास परवानगी नाही. तेव्हा उपस्थितांनी विचारले, “मग दारु पिवून यायला परवानगी आहे का?” यावर ते ‘निरुत्तर’ झाल्याचे व्हिडीओ शुटींगमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. सुमारे १० ते १५ मिनिटे अशा प्रकारे पेशंटस्ची ‘तपासणी’ केल्यावर ते दोघे बाहेर पडले व कारमध्ये बसून निघून गेले.

स्टाफ गपगुमान! – ते दोघे ‘मान्यवर’ कारमधून सिव्हील हॉस्पिटलमध्ये आले, सिव्हील हॉस्पिटलमधील त्यांचा ‘कारोबार’ व परत ते कारमध्ये बसून निघून गेले हे सर्व उपस्थितांनी केलेल्या ‘व्हिडीओ शुटींग’मध्ये ठसठशीतपणे रेकॉर्ड झाले आहे. यावेळी हॉस्पिटलमध्ये सिस्टर्स व अन्य स्टाफ उपस्थित होता. बिचाऱ्या सिस्टर्स ‘गपगुमान’ बसून होत्या… बिचाऱ्या करणार तरी काय?

‘काढा’ ढोसून उपचार – जनतेच्या हातात तरी काय आहे? ज्यांनी याला आळा घालायला हवा तेच यावर ‘पांघरुण’ घालू पहात असतील तर मग गोरगरीब प्रजेने करावे काय? गरीब जनता मोठ्या अपेक्षेने व आशेने उपचारांसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये येत असते, जर अशा प्रकारचे डॉक्टर्स त्यांच्यावर ‘काढा’ ढोसून उपचार करणार असतील तर मग जनतेला वाली कोण? असा प्रश्न आता नाक्या नाक्यावर जनतेतून विचारला जातो आहे.

RELATED ARTICLES

Most Popular