येथील मिरजोळी तसेच शिरळ दरम्यान बुधवारी रात्री किरकोळ कारणावरून जोरदार हाणामारी झाली. यामध्ये एकाच्या डोक्यात हतोडीने प्रहार करण्यात आला तर दुसऱ्यावर धारधार हत्याराने वार करण्यात आले. यामध्ये शकील पेवेकर आणि अमित मोरे हे दोघेजण गंभीर जखमी झाले असून खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तर याप्रकरणी साजिद बेबल व अन्य ९ असे एकूण १० जणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ९ वा. च्या सुमारास चिपळूण मिरजोळी येथील एका टपरीवर काहीजण गप्पा मारत बसलेले असतानाच फिर्यादी साद शकील पेवेकर हा देखील आपल्या चुलत भावाला सोडण्यासाठी त्याठिकाणी आला होता.
त्याचवेळी साजिद बेबल हा देखील त्याठिकाणी होता. दोघांमध्ये काहीकाळ चर्चा रंगली आणि थेट बाचाबाची सुरू झाली. पुढे बाचाबाचीचे रूपांतर मारामारीत होऊ लागले आणि साजिद बेबलने साद पेवेकरच्या कानाखाली मारली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. साद पेवेकर याला मारहाण झाल्याने त्याने आपले वडील शकील पेवेकर यांना त्याठिकाणी बोलावून घेतले. शकील पेवेकर यांनी आपल्या मुलाला मारल्याचा जाब विचारला त्यामुळे पुन्हा जोरदार बाचाबाची झाली. राग इतका अनावर झाला की एकाने थेट जवळच असलेला हातोडा उचलून शकील पेवेकर यांच्या डोक्यात हणला त्यामुळे ते थेट जमिनीवर कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. तात्काळ त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, असे पोलिसांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले.
इतक्यावरच हा विषय संपला नाही तर मध्यरात्री काहीजण पुन्हा शिरळ येथे गेले आणि पुन्हा जोरदार हाणाम री रंगली. लाथाबुक्क्या, दगड आणि धारधार हत्यारांचा वापर देखील यावेळी करण्यात आला. यामध्ये अमित मोरे याच्यावर एक वार झाला असून त्याला देखील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व तातडीने पुढील कारवाईला सुरुवात केली. चिपळूण पोलीस ठाण्यात या संदर्भात साद शकील पेवेकर यांनी फिर्याद दिली असून त्यानुसार साजिद बेबल व अन्य ९ जण असे एकूण १० जणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक देखील करण्यात आली आहे.