तीर्थक्षेत्रे, मंदिरे, धार्मिक स्थळे आदींचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांचे परिसर मद्य, मांसमुक्त करावे, श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान परिसरातील एमटीडीसीचे मद्य आणि मांसविक्री करणारे रेस्टॉरंट हटवावे, अशी मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. भारतीय संविधानाचे कलम २५ सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते. त्यानुसार हिंदूंच्या धार्मिकस्थळी मद्य आणि मांसविक्री करण्यासाठी देणे हे हिंदूंच्या धार्मिक अधिकारावर गदा आणणारे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे.
मंदिर परिसरातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मंदिर परिसर मद्य, मांसमुक्त होणेही आवश्यक आहे, असे समितीचे म्हणणे आहे. श्रीक्षेत्र गणपतीपुळे मंदिर परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रेस्टॉरंटमध्ये मद्य- मांसविक्री सुरू असते, असे स्थानिक भाविकांकडून कळते. त्यामुळे मंदिर परिसराचे पावित्र्य भंग पावत असून, गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने एमटीडीसीचे बार रेस्टॉरंट त्वरित हटवावे, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या वेळी जय हनुमान मंदिराचे (मजगाव) किशोर भुते, श्री विठ्ठल रखुमाई मंदिर (कुवारबाव) मंगेश राऊत, श्री सोमेश्वर सुंकाई एंडोव्हमेंट ट्रस्टचे (सडये-पिरंदवणे-वाडाजून) प्रवीण धुमक, श्री सांबमंदिर (पेठकिल्ला) रमेश सुर्वे, श्री मारूती मंदिर (कसोप- बन) भालचंद्र साळवी, भगवती मंदिर (किल्ला) तन्मय जाधव, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे रत्नागिरी विभाग समन्वयक सुनील सहस्त्रबुद्धे, तालुका समन्वयक सुनीत भावे, हिंदू जनजागृती समितीचे संजय जोशी आदी उपस्थित होते.