सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पावसातील मदतकार्याचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर विलेपार्ले येथे एका तरुणाच्या गाडीने अचानक पेट घेतला. त्याचवेळी, नुकत्याच औरंगाबादहून मुंबईत आलेल्या मुख्यमंत्र्यांनी भर पावसामध्ये गाडी थांबवली. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी त्या गोंधळून गेलेल्या तरुणाला तत्काळ मदत करण्याचे आदेश संबंधित यंत्रणेला दिले. मुख्यमंत्र्यांच्या या मदतीच्या कृत्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. सोमवारी १२ सप्टेंबर रात्री १२.३० च्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.
शहरातील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास एक दुर्घटना घडली. विले पार्ले येथे धावत्या कारने अचानक पेट घेतला. मात्र प्रसंगावधान राखत चालक वेळीच बाहेर पडल्याने सुदैवाने त्याचे प्राण वाचले आहेत. या दुर्घटनेवेळी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गाडी थांबवत सदर कार चालकाला धीर दिल्याचं पाहायला मिळालं.
महागड्या चारचाकी गाडीने पेट घेतल्याने तरुण रडवेला झाला असून प्रचंड चिंतातूर अवस्थेत दिसत होता. मुख्यमंत्री शिंदे त्याच्या जवळ गेले आणि त्यानी या तरुणाला आधार देत ‘जीव वाचला हे महत्त्वाचं आहे. गाडी काय आपण नंतर पण घेऊ शकतो,’ असं म्हणत दुर्घटनाग्रस्त कारच्या चालकाला धीर दिला. तसंच पेट घेतलेल्या गाडीच्या जवळ जाऊ नको बाळा, अशी सूचनाही केली.
मुंबई : वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर मध्यरात्री साडेबारा वाजताच्या सुमारास एका चारचाकी गाडीने पेट घेतला. तिथूनच जात असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाडी थांबवत सदर कारचालकाला धीर दिल्याचं पाहायला मिळालं. @mieknathshinde pic.twitter.com/MwF2mrxAxj
— Maharashtra Times (@mataonline) September 13, 2022
मुख्यमंत्र्यांनी भर पावसात गाडी थांबवत तरुणाला धीर दिल्याने या घटनेचा व्हिडिओ आता समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. दरम्यान, सदर वाहनाने पेट कशामुळे घेतला, याबाबतची माहिती अद्याप समोर आली नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.