सोमवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेविषयी रत्नागिरी जिल्हा किती प्रमाणात तयारीत आहे याबाबत ऑनलाईन आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी त्यावेळी जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा अहवाल सादर केला. जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये चाचण्यांच्या प्रमाणामध्ये वाढ करण्यात आली आहे. तसेच आरोग्य यंत्रणा व प्रशासनाच्या प्रयत्नामुळे पॉझिटिव्हिटी रेटही दहाच्या खाली येण्यास मदत मिळाली असल्याची माहिती यावेळी मिश्रा यांनी दिली.
रत्नागिरी शहरातील बाल कोविड केअर सेंटर आणि महिला रुग्णालयातील बालकांसाठी अतिदक्षता कक्ष आणि स्वस्तिक रुग्णालयातील बालरुग्ण सुविधेसह, महिला रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती सुविधा संयंत्राचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले त्याचे दूरदृष्टी प्रणालीद्वारे सादरीकरण करण्यात आले. जिल्ह्यात असणाऱ्या ऑक्सीजन सुविधेबाबत मुख्यमंत्र्यांनी विचारणा केली असता, जिल्ह्यात सध्या तीन दिवस पुरेल इतका ऑक्सिजन साठा करून ठेवण्यात आल्याचे आणि त्यामध्ये वाढ करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. जिल्ह्यामध्ये ८४० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीची सुविधा उभारण्याची तयारी प्रशासनाने केली असल्याचे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या व्यवस्थापन कामाबाबत असलेल्या पूर्वतयारी बाबत समाधान व्यक्त केले आहे, आणि कौतुकाची थाप देत “जिल्ह्यात चांगले काम झाले”, अशी प्रतिक्रिया दिली आहे. सदर ऑनलाईन बैठकीला राज्याचे उच्चतंत्र शिक्षणमंत्री ना. उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड, रत्नागिरी नगराध्यक्ष प्रदीप साळवी, निवासी जिल्हाधिकारी दत्ता भडकवार, आम. राजन साळवी इत्यादींची उपस्थिती होती.