राज्यात सगळीकडे सर्व शैक्षणिक संस्था कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे बंद ठेवण्यात आल्या आहेत. प्राथमिक, माध्यमिक शाळा, कॉलेज जर सुरू ठेवले तर त्या माध्यमातून जास्त प्रमाणामध्ये कोरोना विषाणूचा फैलाव होऊ शकतो. त्यामुळे मागच्या वर्षी जेंव्हा कोरोनाचा प्रथम रुग्ण सापडला तेंव्हापासूनच सर्व शैक्षणिक संस्था, खाजगी कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश शासनाने दिले होतेत.
रत्नागिरीमधील सर्व शिक्षण संस्था जरी बंद असल्या तरी काही खाजगी कोचिंग क्लासची फी आगाऊ घेण्यात आल्या, परंतु वर्षभर क्लास घेण्यातच आले नसल्याने त्या संस्थांनी एकतर सर्व फी परत करणे अथवा फी पुढील शैक्षणिक वर्षासाठी ग्राहय धरण्यात यावी अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे. परंतु, या काही खाजगी कोचिंग क्लासनी फी परत करण्यास टाळाटाळ करत आहेत, काही संस्था तर जिल्ह्यातून सर्व गाशा गुंडाळून पळ काढला आहे. काही कोचिंग क्लासेस नवीन जागेवर स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी वर्गामध्ये संभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे.
रत्नागिरीमधील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी अगदी प्राथमिक शिक्षणापासून कोचिंग क्लासचे सहाय्य घेताना दिसतात. पालक सुद्धा नोकरदार असल्याने घर आणि नोकरी सांभाळून त्यांची सुद्धा तारेवरची कसरत सुरू असते. त्यामुळे चांगल्यातल्या चांगल्या कोचिंग क्लासला आपल्या पाल्याला पाठविण्याकडे त्यांचा कल असतो. त्यासाठी अगदी हजारो रुपयांची फी भरायची सुद्धा ते तयारी दर्शवतात. पण आता कोरोनामुळे अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत आणि सततच्या लॉकडाऊन मुळे नवीन नोकरी मिळणेही कठीण बनले आहे.
खाजगी क्लास चालकांच्या चाललेल्या या पालकांना वेठीस धरण्याच्या प्रकाराला आळा बसावा आणि त्वरित मागील शैक्षणिक वर्षी भरलेली फी परत मिळावी अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.