राज्यात सगळीकडे लसीकरण मोहीम वेगवान पद्धतीने राबविण्यासाठी सरकार हर तऱ्हेने प्रयत्नशील आहे. कोविड विषाणू निर्बंधित लस सध्या फक्त शासकीय रुग्णालयात, प्राथमिक केंद्रात आणि उपकेंद्रांमध्येच दिली जात होती. परंतु आता शासनाने कोविड लसीकरण करण्यासाठी काही खासगी संस्थांना देखील परवानगी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण १० खासगी वैद्यकीय संस्थांना कोविड लसीकरण केंद्र म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली आहे. तसेच खासगी रुग्णालयांना जरी लसीकरणाची परवानगी दिली गेली असली तरी, त्यामध्ये काही अटी शर्थीची नियमावली आखून दिली आहे. काय आहे नियमावली, त्याबद्दल थोडक्यात पाहूया.
खासगी हॉस्पिटलना नियमावली मध्ये ज्या जागेत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे, त्या जागेमध्ये (Waiting Room)प्रतिक्षा कक्ष, (Vaccination Room)लसीकरण कक्ष आणि (Observation Room) निरिक्षण कक्ष अशा ३ स्वतंत्र खोल्या असणे गरजेचे आहे. निरीक्षण कक्षाला रुग्णांना आत-बाहेर जाण्या येण्यासाठी २ प्रवेशद्वार असणे आवश्यक आहे. तर प्रतिक्षा कक्षामध्ये हात धुण्यासाठी आवश्यक ती व्यवस्था आणि सॅनिटायझरची सोय करण्यात यावी.
आणि सर्वात महत्वाचा म्हणजे लसीकरण कक्ष, लसीकरण कक्षामध्ये लसीकरणाशी संबंधित आवश्यक सर्व यंत्रणा, महत्वाच्या औषधांची सुविधा, लसीकरण संदर्भातील सर्व अत्यावश्यक आरोग्य शिक्षण साहित्य, लसीकरण करताना प्रशिक्षित नर्स आणि डॉक्टरची उपस्थिती असणे आवश्यक आहे़.
लसीकरण मोहीम राबवताना संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यासोबत चर्चा विनिमय करून ठरवावे. प्रत्येक व्यक्तीची प्रथम ऑनलाईन नोंदणी करून मग लस द्यायची आहे. लस दिल्यानंतर किमान ३० मिनीटे निरिक्षण कक्षामध्ये थांबवणे गरजेचे आहे. जेणेकरून लसीचा काही दुष्परिणाम तर होत नाही ना, याची डॉक्टरांना खात्री करता येईल.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मान्यता देण्यात आलेल्या खासगी वैद्यकीय संस्थांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील
- परकार हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर
- यश फाऊंडेशन
- इन्फिगो आय केअर हॉस्पिटल
- निर्मल बाल रुग्णालय
- शिवश्री हॉस्पिटल कारवांचीवाडी
- चिरायू हॉस्पिटल
- जे.एस.डब्ल्यू.एनर्जी लिमिटेड, जयगड
- योगीता डेंटल महाविद्यालय, खेड
- फिनोलेक्स इंडस्ट्रीज असोसिएशन
- लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशन
या १० संस्थांचा समावेश करण्यात आला आहे. खासगी संस्थांनी लसीकरण हे केंद्र व राज्य शासनाच्या वेळोवेळी प्राप्त होणार्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून अंमलात आणायचे आहे.