तटरक्षक दलाची हॉवरक्राफ्ट बोट अचानक दापोली तालुक्यातील पाळंदे समुद्रकिनारी आल्याने येथील ग्रामस्थांना मोठे आश्चर्य वाटले होते. अचानक अशा वेगळ्या प्रकारची बोट किनार्यावर आल्याने आधी एकच गोंधळ उडाला परंतु, माहिती घेतल्यावर खरी घटना समोर आली. ही बोट इंजिनमधील तांत्रिक बिघाडामुळे पाळंदे समुद्र किनाऱ्यावर आणण्यात आली होती. “भारतीय तटरक्षक” असे या बोटीवर लिहिले होते. दरम्यान याबाबत तटरक्षक दलाचे राजा चोलन यांनी सांगितले, की ही बोट मुंबईकडे निघाली असून इंजिनामध्ये बिघाड झाल्याने तिला किनाऱ्यावर आणण्यात आले आहे.
ही बोट थोड्याच वेळात पुढे मार्गस्थ होईल त्यामुळे कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही, घाबरून जाऊन कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि पसरवू देखील नये. ही आलेली बोट बघण्यासाठी आजू बाजूच्या गावातील लोकांनी गर्दी केली होती. कोणी बोटीजवळ उभ राहून फोटो काढत होते, तर काही सेल्फी काढण्यात मग्न होते तर कोणी बोटीची रचना कशी कशी आहे त्याचे व्हिडिओ करण्यात गुंतले होते. कधीही अशा वेगळ्या प्रकारची नौका पहिली नसल्याने इथल्या ग्रामस्थांसाठी हा एक कुतूहलाच विषय ठरला होता.
दापोली तालुक्यात पाळंदे समुद्रकिनारी दि. २७ रोजी तटरक्षक दलाची हॉवरक्राफ्ट बोट किनार्यावर आली. बोट किनार्यावर लागल्याने मोठे कुतूहल निर्माण झाले होते. मात्र, बोट तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यामुळे पाळंदे समुद्र किनार्यावर आणण्यात आली होती. लवकरच बिघाडावर काम सुरु करण्यात आले आहे. दुरुस्ती झाल्यावर लगेचच हि बोट मुंबईकडे रवाना होणार आहे. हॉवरक्राफ्ट बोट पाहून ग्रामस्थांमध्ये मात्र कमालीची उत्सुकता दिसून आली.