अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर वेगळी वाट चोखाळण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मुंबईत न जाता पुणे गाठले. व्यवसाय करायचं हे देखील मनात पक्क होतं. सुरुवातीला ७०० रुपये पगारावर नोकरी केली. आता स्वतःची स्कॉन प्रोजेक्ट कंपनी वर्षाला १२०० कोटीचा व्यवसाय करते. व्यवसायात प्रामाणिकपणा, जिद्द आणि चिकाटी ठेवल्यास उद्योगात नक्कीच यश मिळते. आता लोटे येथील कोकाकोला प्रकल्पाचे काम हाती घेतले असून, ते वर्षात पूर्ण करणार आहे. त्यासाठी कंपनीतील सर्व घटक अहोरात्र मेहनत घेत आहेत, असे जागतिक उद्योजक पुरस्कारप्राप्त नीलेश चव्हाण यांनी सांगितले. फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रिजच्यावतीने जिल्ह्यातील उद्योजकांचा पुरस्कार देऊन सन्मान केला.
या प्रसंगी उपस्थित माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनीही या वेळी उद्योजक चव्हाण यांचे भरभरून कौतुक केले. तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील उद्योजक नीलेश चव्हाण यांच्या स्कॉन प्रोजेक्ट कंपनीने लोटे येथे कोकाकोला कंपनी उभारणीचे काम मिळवून जागतिक स्तरावर बाजी मारली. अनेक कंपन्या स्पर्धेत असतानाही कोकाकोलाचे काम स्कॉन कंपनीने ८०० कोटीचा प्रकल्प मिळवला. याबाबत उद्योजक चव्हाण म्हणाले, कोकाकोलाचा प्रकल्प वर्षात पूर्ण करून जागतिक विक्रम प्रस्थापित करण्याचा मानस आहे. त्यासाठी कंपनीतील सर्व घटक मेहनत घेत आहेत.
कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये कोकणातील लोकांचा टक्का अधिक आहे. त्या कर्मचाऱ्यांना अपघात विमा, वैद्यकीय विमा असे लाभ दिले जातात. सध्या जवळपास १ हजार कामगार कार्यरत आहेत. निवृत्त कर्मचारी करोडपती होऊनच बाहेर पडेल, अशी व्यवस्था आम्ही केली आहे. जगाला काय हवे ते पाहिले, प्रामाणिकपणे व्यवसाय करतानाच नावीन्यता शोधली, सचोटीने वेळेत कामे मार्गी लावली. नेहमीच चिकाटी आणि मेहनत घेतल्याने कंपनीला कर्मचाऱ्यांच्या एकत्र येऊन काम करण्याच्या वृत्तीमुळे व्यवसायाचा विस्तार वाढत गेला आहे.