27.2 C
Ratnagiri
Tuesday, October 22, 2024
HomeRatnagiriदाखल्यासाठी आलेल्यावर दंडात्मक कारवाई, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार

दाखल्यासाठी आलेल्यावर दंडात्मक कारवाई, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकार

जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होती.

माझी लाडकी बहीण योजनेसाठी लागणारा उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी येथील सेतू कार्यालयात प्रचंड गर्दी झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात वाहनांची वर्दळ झाल्याने वाहतूककोंडी होत होती. या परिस्थितीत वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई सुरू केल्याने गोंधळ उडाला होता. हा विषय जिल्हा पोलिस अधीक्षकांपर्यंत पोचल्याने ही कारवाई थांबवून वाहतूक सुरळीत करण्यावर भर दिला. माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद मिळत आहे. गुगल प्ले स्टोअरवरून नारीशक्ती दूत नावाचे अॅप डाऊनलोड करून त्यामधून लाभार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

वार्षिक उत्पन्न अडीच लाखांच्या आत असलेल्यांना याचा लाभ मिळणार असल्यामुळे उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये महिलांची प्रचंड गर्दी होती. अर्जासाठी एकच झुंबड उडाल्याने कर्मचाऱ्यांची अक्षरशः दमछाक झाली. दाखला काढण्यासाठी येणारे दुचाकी वाहन घेऊन आवारात येत होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात वाहनांची वर्दळ वाढली. आधीच नवीन इमारतीचे काम सुरू असल्यामुळे वाहतूककोंडी होत होती. त्यामधून मार्ग काढण्याचा त्रास वाहनचालकांना होत होता.

अनेकांनी रस्त्यावरच वाहने उभी केली होती; परंतु याचा फायदा घेऊन वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्यास सुरवात केली. त्या वेळी भाजपचे पदाधिकारी मुन्ना चवंडे यांनी पोलिसांशी संवाद साधला. नागरिकांना जर आत जाण्यासाठी पर्याय नसेल तर त्यांनी वाहने कुठे लावयाची? त्याची व्यवस्था करा आणि त्यानंतर दंडात्मक कारवाई करा, असे सुनावले. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांना याची माहिती मिळताच त्यांनी कारवाईऐवजी वाहतूककोंडी सोडवण्याचे आदेश वाहतूक पोलिसांना दिले; परंतु याबाबत गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करण्याची गरज आहे.

RELATED ARTICLES

Most Popular