धबधब्यांच्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनांमुळे प्रशासनाकडून लागू केलेले कडक निर्बंध आणि मनाई आदेश यामुळे लांजा तालुक्यातील ‘मिनी महाबळेश्वर’ समजल्या जाणाऱ्या माचाळ या पर्यटन गावाला वर्षा पर्यटनाकरिता पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. वीकेंडला शनिवारी – रविवार या दिवशी माचाळला सर्वाधिक पसंती दिली जात आहे. समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीवर असलेल्या लांजा तालुक्यातील माचाळला जाण्यासाठी आता थेट रस्ता झाल्याने पर्यटकांना अधिक सोयीचे झाले आहे. पावसाळ्यात या ठिकाणचे सौंदर्य अधिक खुलले आहे. लांजा तालुक्याच्या पूर्व दिशेला नयनरम्य माचाळ गाव पर्यटनाच्यादृष्टीने लक्षवेधी ठरला आहे.
येथील निसर्गसंपदा पर्यटकांसाठी आकर्षित करणारी ठरली आहे. मिनी महाबळेश्वर म्हणून माचाळची ओळख आहे. ४०० वर्षांच्या इतिहासाची साक्ष या गावाला लाभलेली आहे. पावसाची रिमझिम, अंगाला झोबणारा वारा, येथील थंडगार हवा, सर्वत्र हिरवाई, समोरच दिसणारा विशाळगड, उच उंच नागमोडी डोंगरकडे, सह्याद्रीच्या हिरव्यागार रांगा, नकळत दृष्टीस पडणारे वन्यजीव, थंडगार पाणी, प्राणी-पक्ष्यांचा आवाज, मुचकुंदी ऋषींची गुंफा, मोठमोठे अनोखे वृक्ष असे हे निसर्ग सौंदर्य पर्यटकांना खुणावते आहे. त्यामुळे या ठिकाणाला पर्यटकांची पसंती वाढती आहे. याच माचाळ या पर्यटन गावापासून अवघ्या दोन किमीवर विशाळगड आहे.
झापाच्या घरांचे आकर्षण – माचाळ गावात अनेक वर्षांची संस्कृती, रूढी-परंपरा जपलेल्या आहेत. पाऊस-वारा यापासून संरक्षित करणारी झापाची घरे येथे येणाऱ्या पर्यटकांना आकर्षण करतात. आता या ठिकाणी आगाऊ राहण्याची, जेवणाची सोय येथील गावकरी करून देतात.