राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री ना. अजित पवार यांनी खरवते-दहिवली येथील माजी खासदार स्व. गोविंदराव निकम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व मा. शरदचंद्रजी पवार उद्यानविद्या व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटनप्रसंगी कोकणच्या विकासाला आघाडी सरकारकडून भरघोस निधी दिला जाईल. विकासाबरोबरच स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध करून देणार्या कामांचे नियोजन सांगा, निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासनही दिले.
या वेळी व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, मध्यवर्ती बँकेचे चेअरमन डॉ. तानाजी चोरगे, खास. सुनील तटकरे, आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय सावंत, माजी आ. सुभाष बने, माजी आ. संजय कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, पूजा निकम, माजी आ. रमेश कदम, शिवसेनेचे राजन महाडिक, प्राचार्य सुनितकुमार पाटील यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी होते.
यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष आ. शेखर निकम यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. यानंतर स्व. निकम यांच्या कठोर कष्टातून उभी राहिलेली संस्था त्यांच्यानंतर प्रगती करताना सर्वांचे पाठबळ सहकार्य मिळाले आहे, अशी भावना व्यक्त करून सह्याद्री परिवाराने जो आपणावर विश्वास टाकला व आपलेपणा जपण्याचे काम यापुढेही केले जाईल. मला राजकारणात काही नको. मात्र, दादांचे आशीर्वाद असावेत. राजकारणात आपल्याला काहीही न मागता दादा देतील, असा विश्वास आहे.
उपमुख्यमंत्री ना. पवार म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे कोकणवर विशेष प्रेम होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचेही कोकणवर विशेष प्रेम आहे. स्व. निकम यांच्या सोबत खासदार म्हणून सहा महिने काम करण्याची संधी मिळाली आणि मग त्यानंतर कायमचा जो संपर्क सुरू राहिला तो आजतागत. यातूनच त्यांच्या कठोर कर्तृत्व व कामाची जाणीव झाली.
निसर्गाने कोकणला भरभरून दिले आहे. येथील फळ, फुले, शेती, इतर व्यवसाय व भौगोलिक परिस्थितीवर आधारित नवनवीन उद्योग निर्माण व्हावेत. त्यासाठी शेखर निकम यांनी पुढाकार घ्यावा. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ. पर्यटनातून रोजगार, रस्ते व रेल्वेचे जाळे निर्माण व्हावे. आघाडी सरकारच्या माध्यमातून कोकणच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी नियोजन व पाठपुरावा करा, असे आवाहन ना. अजित पवार यांनी केले.