गुहागर तालुक्यातील खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयाच्या चौघा प्राध्यापकांना लोखंडी सळ्या आणि काठ्यांनी बेदम मारहाण करण्यात आल्याची तक्रार पोलीस स्थानकात नोंदविण्यात आली आहे. बॉम्बे युनिव्र्व्हसिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स युनियनने (बुक्टु) याप्रकरणात लक्ष घातले आहे व मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांत केलेल्या तक्रारीनुसार मारहाण करणाऱ्यांमध्ये संस्थाचालकांवर आरोप ठेवण्यात आला आहे. याबाबत पोलिसांना पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, गुहागरम धीलखरे-ढेरे भोसलेमहाविद्यालयातील प्राध्यापक गोविंद भास्करराव सानप (सध्या रा. शृंगारतळी, मूळ गाव आंबेजोगाई बीड) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. या शैक्षणिक संस्थेत गेल्या २ ते ३० वर्षांपासून काही संस्थाचालकांच्या माध्यमातून विविध शैक्षणिक कार्य व परिक्षांमध्ये अवैध कामे चालत असल्याच्या तक्रारी पालक व ग्रामस्थांनी दिल्या होत्या. अशा कामांना आपण व आपले सहकारी अनिल शशिकांत हिरगोंड, संतोष विठ्ठलराव जाधव व निळकंठ सखारामं भालेराव यांनी असहमती दर्शविल्यामुळे या प्रकरणात आम्हीच विद्यापीठाकडे तक्रारी केल्याचा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा समज झाला व यातूनच आम्हाला मारहाण केल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
बुधवार दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ८. वा. च्या सुमारास हा प्रकार घडला. गोविंद सानप व त्यांचे सहकारी शिक्षक आपल्या वाहनातून येत असताना गर्ल्स हॉस्टेलसमोर त्यांचे वाहन थांबवण्यात आले. त्यांना खाली उतरवण्यात आले. महाविद्यालयाची जी चौकशी होत आहे ती तक्रार निनावी पत्राद्वारे तुम्हीच केली आहे, असा आरोप करून या प्राध्यापकांना मारहाण करण्यात आली. आम्ही अशी कोणतीही तक्रार केली नाही, असे सांगूनही मारहाण करणारे थांबले नाहीत. आणखी काही वेळाने प्राचार्यांसमोरही आम्हाला मारहाण करण्यात आली, असे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत या प्राध्यापकांनी म्हटले आहे. याप्रकरणी संशयीत म्हणून महेश जनार्दन भोसले, संदीप आत्माराम भोसले, रोहन भोसले (रा. आरे, ता. गुहागर) या तिघांसह आणखी चार ते पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता १३२, ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९ (२), १९१(२), १९०, १३१, १२१(१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकारानंतर प्राध्यापक संघटना, समता सैनिक दलाचे कार्यकर्ते व सामाजिक संघटनांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणावरही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त नाही. प्राध्यापकांना मारहाण केल्याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बॉम्बे युनिव्र्व्हसिटी अॅण्ड कॉलेज टीचर्स युनियनने केली आहे. यासंदर्भातील निवेदन गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना दिले आहे. पोलिसांकडून कारवाईत विलंब होत असल्याने प्राध्यापक संघटना आक्रमक झाली आहे. महाविद्यालयातील संचालक मंडळ बरखास्त करावे, सर्व आरोपींना अटक करावी, गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी करत न्याय मिळवण्यासाठी २१ डिसेंबर रोजी तहसिलदार कार्यालयावर प्राध्यापक, पालक आणि विद्यार्थ्यांचा मोर्चा काढण्याचा इशारा देणारे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले आहे.