शिवसेना ठाकरे गटाचे राजापूरचे आमदार राजन साळवी. यांची मंगळवारी अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात सहकुटुंब चौकशी करण्यात आली. बुधवारी देखील ही चौकशी सुरू राहणार आहे. बेनामी कथित मालमत्ता जमवल्या प्रकरणी आ. साळवी यांची मागील काही महिन्यांपासून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. यापूर्वी साळवी हे ४ वेळा चौकशीसाठी हजर राहिले होते. त्यांचे स्वीय सहाय्यक सुभाष मालप यांची देखील चौकशी करण्यात आली. एसीबीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने त्यांचे राहते घर आणि रत्नागिरीतील हॉटेलचे मुल्यांकन केले.

सहकुटुंब कार्यालयात एसीबीने साळवी यांच्यासह – त्यांच्या कुटुंबालाही चौकशीसाठी पाचारण केले होते. मध्यंतरीच्या काळात एसीबी कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे ही चौकशी लांबली होती. मंगळवारपासून ती पुन्हा सुरू झाली आहे. स्वतः राजन साळवी, त्यांच्या पत्नी सौ. अनुजा, दोन मुले शुभम आणि अथर्व, भाऊ दीपक साळवी, त्यांचे सीए श्रीरंग वैद्य सकाळी ११ वाजता चौकशीसाठी एसीबी कार्यालयात पोहोचले.

खच्चीकरणाचा प्रयत्न – एसीबी कार्यालयात जाण्यापूर्वी आ.साळवी यांच्या पत्नी सौ. अनुजा यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मागील तीन ते चार महिन्यांपासून साळवी यांची चौकशी सुरू आहे. त्यांना हवी ती माहिती आम्ही देत आहोत, तरी देखील चौकशी थांबत नाही. हा सगळा प्रकार म्हणजे त्यांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप सौ. अनुजा साळवी यांनी केला आहे. आम्ही सर्व चौकशीला सामोरे जावू, असेही त्यांनी स्पष्ट केले.