लोटे एम आयडीसीतील’ एका रासायनिक कंपनीमधून मंगळवारी सायंकाळी अचानक वायू गळती सुरू झाल्याने आजूबाजूचे अनेक कामगार घुसमटले. या कंपनीत त्यावेळी कामावर असणारे दोन कामगार बाधित झाले असून ते गंभीर असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान मंगळवारी रात्री उशीरापर्यंत पोलीस कंपनी परिसरात घडलेल्या या प्रकाराची माहिती घेत होते. त्यामुळे रात्रौ उशीरापर्यंत याबाबत कोणताही गुन्हा दाखल झालेला नव्हता. दरम्यान या वायू गळतीचा त्रास झालेल्या काही नागरिकांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, या कंपनीतून वेळोवेळी अशा प्रकारची वायू गळती झालेली. आहे. मंगळवारी देखील अशाच प्रकारे अचानक कंपनीतून विषारी वायूची गळती सुरू झाली.
त्यामुळे कंपनी आणि परिसरात असणाऱ्या अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. ही वायू गळती नेमकी कशी झाली याचा तपशील मिळालेला नाही. कंपनीकडून मौन पाळण्यात येत आहे. तर पोलिसांकडे अधिकृतपणे कोणीतीही माहिती उपलब्ध नाही. वायूमुळे गंभीररित्या जखमी झालेल्या दोन काम गारांना लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती काही काम गारांच्या नातेवाईकांनी पत्रकारांना दिली. हे दोन्ही कामगार परप्रांतीय आहेत.दरम्यान लोटे औद्योगिक वसाहतीत कंपनीमधून वायू गळती होण्याचा गेल्या सहा महिन्यातील हा पाचवा अपघात आहे. वायूंमुळे लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. काहींना मळमळत होते तर काहींना उलट्यांचा त्रास झाला.