महावितरणच्या ठेकेदाराकडे कंत्राटी कामगाराचा शॉक लागून मृत्यू झाला. मात्र महावितरण आणि ठेकेदार कंपनीने जबाबदारी झटकत कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात टाळाटाळ केल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते उदय बने तैसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत चांगलेच आक्रमक झाले. दोघांनी महावितरणच्या कार्यालयावर धाव घेत अधिकारी आणि ठेकेदाराच्या प्रतिनिधीची चांगलीच हजेरी घेतली. त्यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थही जमले होते. वातावरण चांगलेच तापले. अखेर महावितरणने ४ लाखांची भरपाई देण्याची तयारी दाखवली. या आधीही शॉक लागून मृत्यू पावलेल्या तरुणांच्या नातेवाईकानाही चार लाखाचा धनादेश देण्यात आला.
मात्र अद्याप ठेकेदार कंपनीने भरपाई देण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. पुन्हा यासाठी दोन दिवसांनी बैठक घेण्यात येणार आहे. महावितरणमधील कंत्राटी कर्मचारी कुंदन दिनेश शिंदे (वय २१, रा. भावेवाडी, फणसवळे, रत्नागिरी) शहरातील निवखोल येथे दुरुस्तीचं काम करताना विजेचा शॉक लागून मृत्यू झाला होता. मात्र दुर्दैर्वी घटना घडून देखील महावितरण तसेच ठेकेदार कंपनी ग्लोबल सर्विसेसने त्याची दखलच घेतली नव्हती. यामुळे फणसवळे ग्रामस्थ महावितरण कंपनीवर धडकले होते. हे समजताच रत्नागिरी जि. प. चे माजी अध्यक्ष व ठाकरे गटाचे नेते उदय बने तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत हेही महावितरणच्या कार्यालयावर जाऊन पोहोचले.
शॉक लागून मृत्यू पावलेल्या कुंदन शिंदे यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये भरपाई नातेवाईकाला कंपनीत नोकरी पेन्शन व २५ लाख भरपाई देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र यापैकी काहीच झाले नाही. यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले होते. या बैठकीला ठेकेदार कंपनीचा मालक न येता त्याने प्रतिनिधीला पाठवले. त्यामुळे ग्रामस्थांच्या रागाचा तारा अधिकच चढला. हा प्रतिनिधी उन्मत्तपणे बोलत असल्याने उदय बने आणि राजेश सावंत यांनी त्याची चांगलेच हजेरी घेतली. या दोघांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना तसेच ठेकेदाराच्या प्रतिनिधीलाही धारेवर धरले. ठेकेदारांनी काय काय पुरवायचे आहे? महावितरणने कर्मचाऱ्यांना कोणत्या सुविधा द्यायचे आहेत? याची विचारणा केली.
कंत्राटी कामगारांच्या जीवाची जबाबदारी कोणाची? असा सवाल केला. सुरुवातीला जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न होतं होता मात्र दोन्ही पक्षाचे नेते आणि ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा पाहता महावितरणने कुंदन शिंदे यांच्या कुटुंबाला चार लाख रुपयांची भरपाई देण्याची तयारी दाखवत तसा धनादेश काढला. याआधी साळवी नामक तरुणाचा अशाच प्रकारे मृत्यू झाला होता. त्याच्याही नातेवाईकांना या ४ लाखांचा धनादेश देण्यात आला. यावेळी कंपनीकडून काय भरपाई मिळणार? असा थेट सवाल दोन नेत्यांनी केला. त्यावर आता बुधवार दिनांक १६ रोजी बैठक बोलवण्यात आली आहे.