मुंबई-गोवा महामार्गावर आरवली (ता. संगमेश्वर) येथील उड्डाणपुलाखालून जाणाऱ्या पूर्वेकडील चिपळूण-रत्नागिरी रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. आता पाश्चिमेकडील रत्नागिरी-चिपळूण मार्गाचे पावसाळ्यापूर्वी काँक्रिटीकरण व्हावे तसेच नाल्याची कामे पूर्ण करावीत, अशी मागणी केली जात आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात रस्ते महामंडळाने आरवली येथे माखजन व कुचांबे या परिसरासाठी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुलाच्या खालून पूर्व बाजूला कुचांबे, मरडव, कुंभारखाणी बुद्रुक, राजिवली, येडगेवाडीकडे जाण्यासाठी तर पश्चिमेला कोंडीवरे, माखजन, बुरबांड, कासे, करजुवे आदी गावांसाठी रस्ता तयार केला आहे. उड्डाणपूल व सेवा रस्त्याचे काम पावसाळ्याच्या तोंडावर घाईघाईत केल्याने बोजवारा उडाला होता.
त्या रस्त्याचे व्यवस्थित मजबुतीकरण झालेले नव्हते. त्यामुळे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले होते तसेच योग्य सपाटीकरण नसल्याने अवजड वाहने जीव मुठीत धरून चालवावी लागत होती. रस्त्याला नाले काढलेले नाहीत, काही ठिकाणी रस्ता अरूंद आहे. महामार्गावरील आरवली हे माखजन व कुचांबे परिसरातील पंचवीसहून अधिक गावांसाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणाहून एक किलोमीटरवर रेल्वेस्थानक असल्याने तेथे प्रवासी व वाहनांची सतत वर्दळ असते. इथूनच प्रवासी मुंबई, पुणे, कोल्हापूर, रत्नागिरीला जाण्यासाठी मध्यवर्ती अधिकृत थांब्यावर बसची वाट पाहतात ; मात्र रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे अनेकदा एसटी व खासगी वाहनचालक सेवा रस्त्याऐवजी उड्डाणपुलावरून वाहने सुसाट नेतात. यामध्ये प्रवाशांची कुचंबणा होते. प्रवाशांना तिष्ठत वाट पाहावी लागते. या सेवा रस्त्यांची तातडीने दुरूस्ती होणे गरजेचे आहे.