राज्यात महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असतानाच त्याचे पडसाद आता कोकणात उमटू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसने बंडाचे निशाण फडकवले आहे. ४ विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आपले उमेदवार रिंगणात उत्तरवणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी दिली आहे. निर्णय कोणताही होवो आम्ही निवडणूक लढवणार म्हणजे लढवणारच असा इशारा लाड यांनी दिला आहे. राज्यात शिवसेना उद्धवबाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षात जागा वाटपावरून तू-तू मैं-मैं सुरू आहे. त्याचे पडसाद आता कोकणात उमटू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसने मंगळवारी तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व जिल्ह्यातील ४ विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी सांगितले की, जिल्ह्यात काँग्रेसचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. आता आम्हाला आमचे अस्तित्व टिकवायचे आहे. त्यामुळे आता कार्यकर्त्यांमध्ये उद्रेक निर्माण झाला आहे.
राजापुरात त्यांचे अस्तित्व नाही – सध्या राजापूर विधानसभा मतदारसंघात जे काही चित्र निर्माण झाले आहे ते साऱ्यांना माहित आहे. रोज नवनवीन पक्षप्रवेश होत आहेत. उबाठाचे कडवट शिवसैनिक पक्षाला जय महाराष्ट्र करून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत आहेत. या मतदारसंघात उबाठाची ताकद संपली आहे. निष्ठावंत, निष्ठावंत म्हणून ओरड मारायची, मात्र विकासाच्या नावाने बोंबाबोंब आहे. १५ वर्षे आम्ही स्थानिक जनतेने सर्व काही सहन केले. आता आम्हाला उपरे उमेदवार नको, आम्हाला आता स्थानिक उमेदवार हवाय आणि या विधानसभा मतदारसंघातील जनतेने ठरवलेय की स्थानिकच उमेदवार निवडून द्यायचा आहे. जर उबाठाला उमेदवारी मिळाली तर या मतदारसंघात आघाडीचा पराभव निश्चितच होईल. निष्ठावंताची गरज रत्नागिरीला आहे. रत्नागिरीचे पार्सल रत्नागिरीला परत पाठवा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आघाडीत बिघाडी – जिल्ह्यात काँग्रेसने बंडाचे निशाण फडकवल्याने महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून नेहमीच आम्हाला डावलणाऱ्यांना आता त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या बैठकीला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड, महिला जिल्हाध्यक्षा अॅड. अश्विनी आगाशे, राज्याच्या सरचिटणीस रुपाली सावंत, अशोकराव जाधव, दीपक राऊत, अनिरुद्ध कांबळे, खलील सुर्वे, धनिता चव्हाण, अनिता शिंदे, सलवा नावडे, रविंद्र खेडेकर आदी उपस्थित होते.