शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी नदीच्या संवर्धनाची योजना कागदावरच आहे. पाण्यात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काहीही ठोस उपयोजना राबवली गेली नाही. नदी प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची स्थिती आहे. नदीत थेट मिसळणारा कचरा व वाशिष्ठी नदीवरील चार पुलांवरून नदीपात्रात थेट टाकला जाणारा कचरा पालिकेची डोकेदुखी ठरत आहे. वाशिष्ठी नदीच्या पाण्यामुळे शहरात पूर येतो. नदीतील गाळ त्याला कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे गाळाचा मुद्दा दरवर्षी चर्चेत राहतो; मात्र नदीचे प्रदूषण या विषयाकडे कोणीही लक्ष देत नाही. नदीला साडी नेसवणे किंवा जलपूजन करण्यासारखे उपक्रम राबवले जातात; मात्र नदीत कचरा येऊ नये यासाठी आवश्यक असलेली जनजागृती कोणीही करत नाही. खेडीं एमआयडीसीतील कारखान्यांचा मैला, दूषित पाणी वाशिष्ठी नदीत सोडले जाते. चिपळूण शहर आणि उपनगरातील चिकन विक्रेते, मटण विक्रेते त्यांच्या दुकानातील कचरा नागरिकांची नजर चुकवून सायंकाळी वाशिष्ठी नदीत टाकतात.
अनेक विक्रेते शहराच्या बाहेर जाऊन पुलावरून नदीत घाण टाकतात. वाशिष्ठी नदीलगतच्या भागातील अनेक घरातील मैला थेट वाशिष्ठी नदीत सोडण्यात आला आहे. पालिकेच्या मालकीचे शौचालयही नदीच्या काठावर बांधलेले आहे. शहरातील अनेक नागरिक घरातील जुने साहित्य नदीत फेकून देतात. ते कुजल्यानंतर नदीतील पाणी दूषित होते. मध्यंतरी शहरात एक गाढव मेले. त्यालाही वाशिष्ठी नदीत टाकण्यात आले. शहरातील अनेक गृहनिर्माण वसाहतींचे सांडपाणी गटारात सोडले जाते ते शिवनदीमार्गे वाशिष्ठी नदीला जाऊन मिळते. सांडपाण्यामुळे नदीतील पाण्याचा रंगही काळा होतो. ग्रामीण भागात नदीकाठी वसलेल्या गावांचे सांडपाणीही थेट नदीत सोडले जाते. त्यामुळे नदी संवर्धनाचा विषय कागदावर असल्याचे दिसते.

