मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेल्या चौपदरीकरणाचा फटका दस्तुरखुर्द सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनाच बसला. शनिवारी महामार्गाच्या पाहणीसाठी निघालेले मंत्री रवींद्र चव्हाण पळस्पे येथून खारपाडा येथे पोहचले आणि त्यांच्या वाहनाचा ताफा वाहतूक कोंडीत सापडला. वाहनांची वर्दळ इतकी होती कि त्यांना आपल्या वाहनांचा ताफा वळवून माघारी किंवा समोरील वाहतूक थांबवून पुढे देखील जाणे शक्य झाले नाही. खारपाडा ते पेणपर्यंत वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्याने प्रवास करणाऱ्यांची चांगलीच कोंडी झाली होती. पंधरा दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. या कालावधीत चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होईल का, असासवाल आजच्या वाहतूक कोंडीनंतर कोकणवासीय विचारत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गाच्या एका मार्गिकेचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण वारंवार काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी करीत आहेत. गणेशोत्सवापूर्वी एका मार्गिका काँक्रिटीकरण करण्याचा शब्द सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी ‘दिला आहे. यामुळे आतापर्यंत ना. रवींद्र चव्हाण यांनी अनेकदा महामार्गावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आहे. शनिवारी सकाळी ना. रवींद्र चव्हाण महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी करण्यासाठी पळस्पे येथून निघाले. पळस्पे ते खारपाडा पर्यंत येत असताना महामार्गावर उतरून त्यांनी पाहणी केली. जिते गावानजीक आल्यानंतर सुरु असलेल्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे महामार्गावरील वाहतूक एका मार्गिकेवरून वळविण्यात आली होती.
यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली. या वाहतूक कोंडीत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि त्यांच्या सोबत असलेला लवाजमादेखील वाहतूक कोंडीमध्ये सापडला. मुंबई-गोवा महामार्गावर पेण खारपाडा दरम्यान एक मार्गिकेमधून दुतर्फा वाहतूक वळविण्यात आली. होती. सकाळी साडेसात वाजल्यापासून वाहतूक कोंडी होण्यास सुरुवात झाली. महामार्गावर एक एसटी बंद पडली, एका ठिकाणी कंटेनर आडवा झाला. यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला. दुपारी एक वाजेपर्यंत पेण शहरापासून खारपाडा पुलापर्यंत वाहतूक ठप्प होती