पाचाड येथील शासकीय ठेकेदार अनिल मारुती चिले (५८) यांची रात्रीच्यावेळी कार अडवून त्यांना तिघांनी बेदम मारहाण केल्याची घटना काही दिवसापूर्वी बायपास मार्गावर घडली होती. या मारहाणीत चिले गंभीररित्या जखमी झाले होते. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल होता. चिपळूण पोलीसांनी सोलापूरहून एकाला अटक केली आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. स्वप्निल युवराज बनसोडे (२५, सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. २८ नोव्हेंबर रोजी अनिल चिले हे त्यांच्या कारने एकटेच गुहागर-बायपास रस्त्याने घरी जात होते. रात्री ९.१० च्या सुमारास या मार्गावर प्रवास करत असताना एका वळणावर तीन व्यक्ती दुचाकीवरुन आल्या व त्यांनी दुचाकी चिले यांच्या कारसमोर आडवी उभी केली. त्या तिघांपैकी एकजण त्याच्या कारजवळ आला व त्याने ‘आमच्या दुचाकीला डॅश देऊन तुम्ही पळून जाता काय’ असे बोलत असताना सोबत असणाऱ्या दोघांनी ‘तुम्ही खाली उतरा’, असे बोलून त्यांना कारच्या बाहेर खेचत मारहाण करण्यात केली.
यात ते गंभीर जखमी झाले होते. या घटनेनंतर ते तिघेजण न थांबता पळून गेले होते. याप्रकरणी तिघावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुह्याचा तपास सुरु असताना पोलीसांना काही महत्वाचे धागेदोरे हाती लागले. त्या आधारे मारहाण करणाऱ्या स्वप्निल युवराज बनसोडे (२५, सोलापूर) याला अटक केली. उपविभागिय पोलीस अधिकारी प्रकाश बेले, पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक पमुख पोलीस उपनिरीक्षक ओम आघाव, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप माणके, पोलीस नाईक रोशन पवार, पोलीस कॉन्स्टेबल रुपेश जोगी, शैलेश वनघे आदीच्या पथकाने सोलापूर जिह्यातून स्वप्निलला अटक केली. त्याला शनिवारी येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या पप्रकरणी गुन्हा दाखल असलेले अन्य दोघेजण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

