जिल्ह्यातून अमली पदार्थाला हद्दपार करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाकडून जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. या अनुषंगाने चिपळूणं पोलिसांनीही कंबर कसली असून सोमवारी गोवळकोट रोड येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या दोन तरूणांवर कारवाई केली. यामुळे शहरासह तालुक्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. अमली पदार्थाच्या नशेमुळे सध्याची तरूणाई बरबाद होऊ लागली आहे. अमली पदार्थ सेवनामुळे त्यांची कुटुंब उध्वस्त होत आहेत, याबरोबरच गुन्हेगारी प्रवृत्ती सुध्दा वाढत असल्याचे भयानक चित्र निर्माण झाले आहे. याची गंभीर दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी ‘अमली पदार्थमुक्त जिल्हा’ करण्यासाठी विशेष पाऊल उचलले आहे. याच अनुषंगाने अनुषंगाने संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात व्यापक मोहीम हाती घेऊन अमली पदार्थ विक्रेते, सेवन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहेत.
त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी जोरदार मोहीम राबविली जात आहे. चिपळूण पोलीस यंत्रणाही अधिक सतर्क झाल्याचे केलेल्या कारवाईतून दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी सावर्डे येथे केलेल्या कारवाईत एकावर गुन्हा दाखल करून त्याच्याकडील गांजा जप्त करण्यात आला होता. तर आता गोवळकोट येथे केलेल्या कारवाईत दोन तरूणांना ताब्यात घेण्यात आल्याने चिपळूण तालुक्यातही अंमली पदार्थाची विक्री आणि सेवन जोशात सुरू असल्याचे दिसून येत आहे. शहरातील गोवळकोट रोड परिसरात अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी सोमवारी येथील पोलीस स्थानकात दोन तरूणांवर गुन्हा दाखलं झाला आहे. या दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून कसून चौकशी केली जात आहे. राज राजेश लांजेकर (२१, रा. लांजा बाजारपेठ, रत्नागिरी सध्या रा. पालवण सावर्डे, चिपळूण), तसेच शैलेश प्रकाश कदम (३४, रा. मिरजोळी बौध्दवाडी, चिपळूण) अशी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलीस नाईक रोशन शंकर पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राज लांजेकर हा गोवळकोट रोड येथील पालोजी बाग येथे वाशिष्ठी नदीकिनारी सोमवारी दुपारी ३.३० वाजता एका झाडा खाली बसून गांजा सदृश्य अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळून आला. तसेच पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा अश्रुबा दराडे यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार शैलेश प्रकाश कदम हाही गोवळकोट रोड येथील मोहसीन अपार्टमेंटच्या परिसरात सोमवारी सायंकाळी ४.४५ वाजता अंमली पदार्थाचे सेवन करताना दिसून आला. त्याप्रमाणे या दोघांवरही एन.डी.पी.एस. अॅक्ट १९८५ चे कलम ८ (क), २७नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.