कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव हद्दीत रस्त्यावर एप्रिलमध्ये भेगा पडल्या होत्या. पावसाळा सुरू झाल्यानंतर या भेगा आणखी रुंदावल्या आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाळ्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने, त्यांनी हा प्रकार तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या लक्षात आणून दिला. शुक्रवारी (ता. २७) तहसीलदारांनी अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून घटनास्थळी पाहणी केली व दोन दिवसांत दुरुस्तीच्या सूचना दिल्या. यावेळी पळचिल ग्रुप ग्रामपंचायतीचे माजी सरपंच उमेश मोरे, रवींद्र जाधव, प्रवीण मोरे, ग्रामस्थ आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कशेडी घाटात भुयारीमार्गे चौपदरीकरणाचे काम करण्यात आले. यावेळी भोगाव गावाच्या हद्दीत उत्खनन करून डोंगर कापण्यात आला. नवीन महामार्ग भुयारामार्गे वळविण्यात आला. याठिकाणी भोगावच्या हद्दीत जुन्या मार्गावरील रस्त्याला ५ ते १० मीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या.
सद्यःस्थितीत कशेडी घाटातील वाहतूक भुयारीमार्गे होत असल्याने कातळी बंगला म्हणजेच कशेडी टॅपच्या जुन्या नाक्यापर्यंत नेणाऱ्या जुन्या महामार्गावर वाहतूक कमी प्रमाणात सुरू आहे. यामुळे वाहतुकीला कोणताही अडथळा नसला, तरी भविष्यात किंवा पावसाळ्यात भुयारामार्गे काही अनुचित प्रकार घडल्यास पुन्हा मूळ कशेडी घाटातील जुन्या महामार्गावरून पर्यायी मार्ग म्हणून वाहतूक वळवावी लागणार आहे. यासाठी या जुन्या महामार्गाची देखभाल दुरुस्ती महत्त्वाची आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने वेळीच भेगा रुंदावण्यावर तत्काळ उपाययोजना करावी, अशी सूचना तहसीलदार कपिल घोरपडे यांनी अभियंत्यांना केली आहे.
भोगावमध्ये रस्ता पुन्हा खचला – पोलादपूर तालुक्यातील भोगाव हद्दीतील २००५ च्या अतिवृष्टीत खचलेला रस्ता दरवर्षीप्रमाणे यंदाही सुमारे ९० ते १०५ फूट लांब आणि दोन ते पाच फूट खोल खचला आहे. यावर्षी कशेडी घाटाला पर्यायी भुयारी मार्ग सुरू झाल्याने या खचणाऱ्या डेंजर झोनकडे डागडुजी करण्यात अक्षम्य दिरंगाई करण्यात आल्याचे दिसून येत आहे.