शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद सकारात्मक होण्यासाठी संयुक्त सभा झाल्या पाहिजेत. त्यामधून शैक्षणिक वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम सती चिंचघरी येथील पालक सभेत केले. सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित खेडीं चिंचघरी सती येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये आयोजित पालक सभा व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात बोलत होते. या प्रसंगी आमदार निकम यांच्या हस्ते पाचवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएस परीक्षा, सारथी शिष्यवृत्ती या स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी, विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी, दहावी-बारावीतील प्रथम तीन क्रमांकांचे विद्यार्थी, नवोदय विद्यालयात निवड झालेले, नासामध्ये निवड झालेले विद्यार्थी, इन्स्पायर अॅवॉर्ड, बाहुली नाट्यातून रस्ता सुरक्षा उपक्रम, आदी विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला.
गांधी रिसर्च फाउंडेशन आयोजित गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता या स्पर्धेत विद्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक, तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक आल्याबद्दल शेखर निकम यांच्या हस्ते विद्यालयाचा सत्कार करण्यात आला. या पालक सभेला ९०० हून अधिक पालक उपस्थित होते. विद्यालयाच्या विविध उपक्रमांची संस्थेच्या आतापर्यंतच्या कार्याची माहिती प्राचार्य संजय वरेकर यांनी दिली. या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, प्रमोद पवार, पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य, उपमुख्याध्यापक विश्वास दाभोळकर, पर्यवेक्षिका राजे शिर्के, पर्यवेक्षक पांडुरंग काळुगडे, सहकारी शिक्षक उपस्थित होते.