गेल्या काही दिवसांत शहराच्या मध्यवर्ती भागातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीत मगरींचा वावर वाढला आहे. बाजारपेठेतील मुख्य रस्त्यावरच रात्रीच्यावेळी मगरींचा मुक्तसंचार वाढला आहे. चिंचानाका येथे रस्त्यावर आलेल्या मगरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायलर होत आहेत. शहरातून वाहणाऱ्या वाशिष्ठी व शिवनदीत मगरींचे प्रमाण खूपच वाढले आहे. अगदी रहदारी असलेल्या बाजारपूल व शिवनदी पुलानजीक भल्यामोठ्या मगरींचे दर्शन नेहमी होते. आता मगरींच्या पिलांचे प्रमाणही वाढले आहे. या दोन्ही नद्यांमध्ये जागोजागी मगरी दिसू लागल्या आहेत.
आतातपर्यंत या मगरींपासून कोणताही धोका पोहोचलेला नाही; परंतु मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शहरातील गोवळकोट चर येथे कायम मगरी असतात. साधारण तीन फुटापासून दहा फूट लांबीच्या मगरी येथे आहेत. सुमारे ६० हून मगरींचे वास्तव्य या परिसरात आहेत. रस्त्यावरून येता- जाता येथे मगरी दिसतात. हे ठिकाण मगरपॉईंट’ म्हणून पर्यटकांमध्ये परिचित आहे. या ठिकाणच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू होते; मात्र निधीअभावी हे काम रखडले. आता शहरातील अन्य भागातही मगरींचा वावर वाढला आहे.
या मगरी रात्रीच्यावेळी थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांमध्येही भीती व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी बाजारपेठेतील शिवनदी पुलावर दहा फुटी मगर मुक्तपणे संचार करत होती. हा प्रकार काही वाहनधारकांनी कॅमेराबद्ध केला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.