कोकणातील चाकरमान्यांचा मुंबईकडे परतीचा प्रवास सुरु झाला असल्याने आता बस, रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी दिसून येत आहे. रेल्वेतील गर्दीमुळेच मुंबईकडे परतणारा पोलीस कर्मचारी रेल्वेतून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना सुकीवली गावानजीक रत्नागिरी दिवा पॅसेंजर जात असताना घडली. मुंबई पोलिसात असणाऱ्या या कर्मचाऱ्याचे नाव उमेश भोसले असून ते गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.
मुंबई पोलिसात असलेले उमेश भोसले हे दापोलीतील गावी मे महिन्याची सुट्टी घालवण्यासाठी आले होते. काही दिवसांची सुट्टी घालवून ते पुन्हा मुंबईकडे कामावर रुजू होण्यासाठी परतत होते. काल रविवार असल्याने रत्नागिरी दिवा पॅसेंजरला प्रचंड गर्दी होती. त्यामुळे ते दरवाजावर थांबूनच ते रेल्वेतून प्रवास करत होते. ते रेल्वेच्या दरवाजावर थांबले असतानाच रेल्वे सुरु झाली, त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी त्यांना व्यवस्थित उभही राहता आले नसल्याने हात सुटल्याने तोल जावून ते चालत्या रेल्वेतून खाली पडले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कोकण रेल्वे मार्गावरील सुकीवली गोपाळवाडी नजीक धावत्या रेल्वेमधून ४५ वर्षीय युवक पडून गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी सांयकाळी ४.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबईकडे रवाना झालेल्या रत्नागिरी दिवा पॅसेंजरमध्ये गर्दीमधून प्रवास करत असलेले भोसले या पोलीस कर्मचाऱ्याचा अचानक तोल गेल्याने तो रेल्वे रुळावर पडला व तो गंभीर जखमी झाला आहे. अधिक उपचारासाठी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सुकावली गावाजवळ ते रेल्वेतून पडल्यानंतर त्या ठिकाणी रुग्णवाहिका मागवून घेण्यात आली, मात्र ते धावत्या रेल्वेतून पडून जखमी झाल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात मार लागला आहे. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आले आहे.