आठवडा बाजार येथे दुचाकी बाजूला काढल्यावरून जोरदार राडा झाला. पान टपरीसमोरील दुचाकी बाजूला केल्याच्या रागातून बाप-लेकांना धरून ठेवत लोखंडी रॉडने मारहाण करून डार मारण्याची धमकी देण्यात आली. शनिवार (ता. ६) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. प्रकरणी शहर पोलिसांत तक्रार करण्यात आली असून सात जणांविरोधात शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. विपुल नागवेकर, मुन्ना नागवेकर, ईशांत नागवेकर, अंकित मयेकर (तिन्ही रा. मुरुगवाडा कावळवाडी, रत्नागिरी) आणि तीन अज्ञात, अशा एकूण ७ जणांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, त्यांच्याविरोधात स्वप्निल नरेंद्र गावखडकर (रा. रत्नागिरी) यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे.
आठवडा बाजार येथील जोशिला वाईन मार्टसमोर पान टपरी आहे. शनिवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास त्यांच्या पान टपरीसमोर संशयितांच्या तीन दुचाकी अस्ताव्यस्त लावून ठेवलेल्या होत्या. दरम्यान, सायंकाळी पाच वाजता पान टपरीसमोर पाणी बॉटलची गाडी आल्याने फिर्यादीचा भाऊ सूरज हा त्या दुचाकी बाजुला करत होता. तेव्हा एक संशयित तिथे आला. तू माझ्या गाडीला हात का लावलास, अशी विचारणा करून अंगावर गेला. स्वप्निल गावखडकरने त्याला वाद कशाला करताय, असे विचारले. यावरून संशयित तिथून फोनवर बोलत गेले.
काही वेळाने संशयित पुन्हा तिथे आले आणि त्यांनी फिर्यादीचा भाऊ सुरजला मारहाण करण्यास सुरुवात केली. म्हणून स्वप्निल आणि त्याचे वडील नरेंद्र गावखडकर हे दोघे गेले असता त्यातील तीन अज्ञातांनी या दोघांना धरुन ठेवले. तर ईशांत नागवेकर, अंकित मयेकर या दोघांनी त्यांना हातांच्या ठोशांनी मारहाण केली. त्यानंतर मुन्ना नागवेकरने यांनी तक्रारदार स्वप्निलच्या डोक्यात लोखंडी रॉड हाणला, तर विपुल नागवेकरने एक किलोचे लोखंडी वजन त्याच्या डोक्यात मारुन दुखापत केली. तुम्हाला बघून घेईन असे म्हणत आणि ठार मारण्याची धकमी दिली. याप्रकरणी सात संशयितांविरोधात शहर पोलिसात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.