देवरुख पोलिस वसाहतीची दैना झाली असून, सुविधांअभावी वसाहतच रिकामी आहे. या वसाहतीत उंदीर, घुशी आणि सापांचा वावर वाढलेला आहे. पोलिसांचे प्रश्न सोडवण्याकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाले आहे. देवरुख येथे ११ पोलिस कुटुंबीय राहतील, अशी इमारत बांधण्यात आली आहे; परंतु या ठिकाणी पाणी, वीज आणि स्वतंत्र शौचालय या आवश्यक सोयी नसल्याने या ठिकाणी कोणीही कर्मचारी राहत नाही. गेली सहा वर्षे ही इमारत पडून आहे. पोलिस कुटुंबीयांना आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी देवरुख पोलिसांमार्फत करण्यात येत आहे; परंतु याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.
बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी लाखो रुपयांचा निधी खर्च करून तीन खोल्यांची डागडुजी केली. दोन खोल्या मिळून एक शौचालय बांधण्यात आले आहे. या वसाहतीमधील खोल्या खूप लहान आहेत. त्यामुळे या ठिकाणी राहणे शक्य नाही. ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात यावी, अशी मागणी पोलिस कर्मचारी करत आहेत. पोलिस कुटुंबीयांना राहण्यासाठी स्वतःची जागा असतानाही भाड्याच्या जागेत राहावे लागत आहे तर काही कर्मचारी रत्नागिरी, संगमेश्वरसह आजूबाजूच्या गावांमधून येत आहे. त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. देवरुखात मोठ्या प्रमाणात दुर्गम भाग आहे. पोलिस ठाण्याजवळ असलेली इमारत पाडून तिथे नवीन इमारत उभी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.