देवरुख ग्रामीण रुग्णालयाची नूतन इमारत पूर्ण होऊन अनेक महिन्याचा कालावधी गेला आहे; परंतु अद्यापही रुग्णांसाठी नवीन इमारतीचे दरवाजे बंदच आहेत. सध्या ग्रामीण रुग्णालय सुरू असलेल्या इमारतीमध्ये अपुऱ्या सुविधा असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यामुळे रुग्णालय कधी सुरू करणार, असा प्रश्न उपस्थित आहे. होत ग्रामीण भागातील गरीब गरजू रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणे सोयीचे होते; परंतु सध्या सुरू आसलेल्या रुग्णालयातील इमारतीमधील जागा अपुरी आहे. देवरुख ग्रामीण रुग्णालयाला ३० बेड मंजूर आहेत. ३० बेडचे रुग्णालय असताना केवळ चार बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे रुग्णाची संख्या वाढली तर रत्नागिरी अथवा संगमेश्वर येथे रुग्णाला घेऊन जावे लागते. त्यामुळे रुग्णांना त्रास सहन करावा लागतो.
देवरुख येथेच रुग्णांना चांगल्या सेवा मिळाव्यात यासाठी सुसज्ज इमारत उभी करण्यात आली आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी रुग्णालयात प्लांट असावा, असे शासनाचे निर्देश आहेत. २०२० मध्ये देवरुख ग्रामीण रुग्णालयाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यावेळी प्रक्रिया प्लांटचा समावेश करण्यात आलेला नव्हता. शासनाच्या आदेशानुसार, या प्लांटचे काम सुरू करण्यात आले होते. हे काम पूर्ण झाले आहे. जिल्हा परिषदेच्या पायाभूत विकास कक्षकडून बांधकाम विभागाकडे इमारत वर्ग करण्यात आल्यानंतर रुग्णालय सुरू होईल. त्यामुळे रुग्णालय लवकर सुरू होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पावसाळा असल्याने साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे.
देवरुख रुग्णालयासाठी तीन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. यातील दोन पदे भरण्यात आली असून, एक रिक्त आहे. त्यातील एक डॉक्टर प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे एका वैद्यकीय अधिकाऱ्याकडे रुग्ण तपासणी करण्याची जबाबदारी आहे. दिवसाला रुग्णालयात ८० ते ९० रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. पावसाळा असल्यामुळे रुग्णांची संख्याही वाढत आहे. रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ पद रिक्त आहे. त्यामुळे सध्या असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना गरोदर माता आणि प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना उपचार द्यावे लागतात. रुग्णालयाचे काम पूर्ण झाले असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.