निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडून भरकटत मिऱ्या किनाऱ्यावर अडकलेले बसरा स्टार जहाज काढण्याची प्रक्रियेने सुरू झाली आहे. त्यासाठी जहाजाजवळील बंधाऱ्याचे दगड हटविण्याचे काम सुरू आहे. या बंधाऱ्याच्या कामाचे नियंत्रण असलेल्या पतन विभागाने ही माहिती दिली. एम. एम. शिपिंग कार्पोरेशन कंपनीचे आतिफ सोलकर हे यासंदर्भात कस्टम, मेरिटाई बोर्डाशी पत्रव्यहार करत आहेत. परवानगी मिळाल्यानंतर दोन महिन्याच्या आत ते सडलेले जहाज कापून बाहेर काढले जाईल. त्यामुळे ि यंदाचा पावसापूर्वी रखडलेले मिऱ्या बंधाऱ्याचे सुमारे दोनशे मीटरचे काम करता येणार आहे. मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याच्य रखडलेल्या कामामुळे पतन विभागाने याबाबत मेरिटाईम बोर्ड आणि कस्टम विभागाला अडकलेले बसरा स्टार जहाज काढण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.
त्याला मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या आढावा बैठकीत अधिक चालना मिळाली. त्यामुळे हे जहाज काढण्याच्या कामाला गती मिळाली आहे. बसरा स्टार जहाज ३ जून २०२० ला निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडले. वादळाचा धोका वाढल्याने सुरक्षेसाठी हे जहाज समुद्रात नांगरुन ठेवण्यात आले होते. मात्र अजस्त्र लाटांच्या तडाख्यात नांगर तुटून हे जहाज भरकटत मिऱ्या समुद्रकिनारी लागले. हे जहाज काढण्यासाठी आता एम एम शिपिंग कार्पोरेशन कंपनी कस्टम आणि मेरिटाईम बोर्डाच्या कन्सल्टंट म्हणून काम करत आहे. दुबई येथील जहाज मालकाशी संपर्क झाला असून त्याला ४० लाखाची कस्टम ड्युटी भरल्यानंतर ते भंगारात काढण्याबाबतची प्रक्रिया सुरू होणार आहे.
दृष्टिक्षेपात – ५०० मेट्रिक टन जहाजाचे वजन, ३५ कोटी होती जहाजाची किंमत, ५ वर्षे समुद्राच्या पाण्यात जहाज सडले, २ महिन्यांत २ कोटींत निघणार भंगारात