तालुक्यातील देवळे परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या आंबाबागांचे गवारेड्यांकडून अतोनात नुकसान केले जात असून, यावर वनविभागाने त्वरित उपाय योजना करावी, अशी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची मागणी आहे. देवळे-चाफवली गावातील आंब्याच्या बागातून गवारेड्यांचे कळपच्या कळप येत असून, हातातोंडाशी आलेल्या आंबा पिकांचे भयानक नुकसान करत असून, यावर कोणती उपाययोजना करता येत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. हे गवारेड्यांचे कळप आंबाबागातून घुसतात आणि जिथपर्यंत मान पोहोचते तिथपर्यंतचा आंबा ओढून खातात किंवा फांद्यांना घासून फांदी हलवतात व मोडतातही. त्याने आंबा खाली पडला की, तो खातात. यामुळे आंबा बागायतदारांचे फार मोठे नुकसान होत असून, यावर पर्यायच मिळत नसल्याने व ते हाकलूनही जात नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
काजू बागायतीमध्येही गवारेडे असेच फार मोठे नुकसान करत असून, छोटी-मोठी काजूची झाडे शिंगात अडकवून उपटून टाकतात. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. देवळे गावातील सलीम खतीब, नाझीम खतीब, चाफवली येथील लक्ष्मण चाळके, प्रकाश चाळके यांच्या आंबाबागांचे गवारेड्यांनी फार मोठे नुकसान केले आहे. हे गवे फक्त रात्रीच नव्हे तर दिवसाही बागांतून फिरू लागले आहेत. त्यामुळे यांचा बंदोबस्त कसा करावा, या विवंचनेत या भागातील शेतकरी सापडले आहेत.