मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे; परंतु महामार्गावरील चिपळूण ते रत्नागिरीदरम्यान अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे तर काही ठिकाणी रस्ते खचण्याची भीती वाहनचालकांना आहे. महिन्याभरानंतर येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने गांभीर्याने पाहावे, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाचे, महामार्गांच्या उभारणीबाबत त्यांच्या दृष्टिकोनाचे नेहमीच कौतुक होते; मात्र मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चुकीच्या कामामुळे या कामाला दृष्ट लागली आहे.
या मार्गावरील खड्ड्यांतून प्रवास करताना प्रवाशांच्या तोंडात वारंवार गडकरींचेच नाव येते. महामार्गावर आरवलीपासून पुढे चौपदरीकरणाचे काम उशिराने हाती घेण्यात आले. आरवली ते हातखंबा या दरम्यान एकेरी मार्ग पूर्ण झालेला नाही. दुसऱ्या मार्गाचे काम सुरू आहे. खेरशेत, आरवली, धामणी, कडवई फाटा, तुरळपासून अगदी हातखंब्यापर्यंत रस्ता चौपदरीकरणासाठी डोंगर फोडण्यात आले आहेत. या ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका कायम आहे. खड्ड्यांमुळे रस्त्यावरून प्रवास करणे मोठे दिव्य ठरत आहे.
गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळे चाकरमान्यांचा रोष कमी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चव्हाण महामार्गाच्या पाहणीसाठी आले होते. चाकरमान्यांची समजूत काढण्यासाठी त्यांनी बैठका सुरू केल्या आहेत. गेल्या वर्षीही असाच बैठकांचा फार्स केला होता. तरीही खड्ड्यांतूनच प्रवास करत गणेशभक्तांना कोकणात जावे लागले होते.