आंबा घाटातील सड्याचा कडा ठिकाणावर दोन मृतदेह आढळून आले आहेत. दोन्ही पुरुषांचे मृतदेह असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. सुमारे दीडशे फूट खोल असल्याने मृतदेह बाहेर काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. एका आश्रमातील हे तरुण असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. स्वरूप दिनकर माने (वय २४, रा. कवठेपिरान, जि. सांगली) व प्रशांत श्रीरंग सातवेकर (१९, रा. निपाणी, जि. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. आंबा घाटातील सडा पॉईन्ट येथे बेवारस दुचाकी आढळून आली. या माहितीवरून मुर्शी पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी दीडशे फूट दरीमध्ये दोन मृतदेह असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले; मात्र आत्महत्येचे कारण काय याबाबत उलगडा झाला नाही.
दुचाकीच्या नंबरवरून पोलिसांनी याची माहिती घेतली. मिरज येथील ही दुचाकी असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावरून स्वरूप माने व प्रशांत सातवेकर हे दोघे तरुण असल्याचे कळते. मृतदेह वर काढण्यासाठी साखरपा, देवरूख पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत; मात्र ते शक्य नसल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, देवरूख व शाहूवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले आहेत. या संदर्भात जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी झालेल्या घटनेला दुजोरा दिला. मृतदेह खोल दरीत असल्यामुळे पोलिसांची टीम त्यावर काम करत आहे. एका आश्रमातील हे तरुण असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे, असे त्यांनी सांगितले.