शहरानजीकच्या सडामिऱ्या (पुळणी) समुद्र किनाऱ्यावर भलामोठा ४५ फूट लांबीचा व्हेल मासा मृतावस्थेत आढळला. दहा दिवसांपूर्वी हा व्हेल मासा मृत झाल्याचा अंदाज वन विभागाने वर्तवला असून तो किनाऱ्यावर कुजलेल्या अवस्थेत होता. सायंकाळी त्या माशाला किनाऱ्यावर जेसीबीने खड्डा काढून दफन करण्यात आले. आज सायंकाळी परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास हा व्हेल मासा आला. त्याबाबत माहिती वन विभागाला दिली. वनविभाग, कांदळवन आणि अभ्यासकांना या घटनेची खबर मिळताच बुधवारी विभागांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या मृतावस्थेतील माशाचा पंचनामा केला. हा मासा सुमारे १० दिवसांपूर्वी मृत झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
वन परिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार व वनक्षेत्रपाल कांदळवन कक्ष रत्नागिरी किरण ठाकूर, न्हानू गावडे, वनपाल पाली य वनरक्षक प्रभू साबणे व कांदळवन कक्ष प्रकल्प सहायक, स्थानिक ग्रामस्थ व श्रीकृष्ण होतेकर प्रभारी आदी उपस्थित होते. गेल्या चार महिन्यांतील ही दुसरी घटना आहे. नोव्हेंबरमध्ये गणपतीपुळेच्या समुद्र किनाऱ्यावर व्हेल माशाचे पिल्लू पाण्याच्या लाटांबरोबर येऊन अडकले होते. रत्नागिरी वन विभागाकडून त्याला जीवदान देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. व्हेल माशाच्या त्या पिल्लाला रेस्क्यू करण्यात यश आले होते.