25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeKokanनवजात लेकराचा अडीच लाखात सौदा, आईसह ८ जणांना अटक

नवजात लेकराचा अडीच लाखात सौदा, आईसह ८ जणांना अटक

ही टोळी लहान मुलांना पळवून नेऊन त्यांची विक्री करत असल्याची माहिती मिळाली.

मुंबईतील मानखुर्द येथे राहणाऱ्या महिलेने मध्यस्थींच्या मदतीने आपल्या १७ दिवसाच्या बाळाला अडीच लाख रुपयांमध्ये विकण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना खारघरमध्ये उघडकीस आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पथकाने खारघरमध्ये सापळा लावून लहान बाळाला विकण्यासाठी आलेल्या आईला तसेच बाळ विक्रीसाठी मध्यस्थी करणारे अशा एकूण ८ जणांना अटक केली आहे. . कारवाईत अटक करण्यात आलेल्या टोळीने अशाच पध्दतीने अनेक लहान मुलांची विक्री केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

कारवाईत अटक करण्यात आलेल्यांमध्ये बाळाची आई मुमताज रहेमान मंडळ (२८, रा. मानखुर्द महाराष्ट्र नगर), मध्यस्थी मुमताज नियाज अब्बास खान (४८), नदिम शाहिद अहमद अन्सारी (२९), गुलाम गौस अहमद अन्सारी (३७), सुरेश शामराव कांबळे (६०) सर्व राहणार मुंब्रा तसेच जुबेदा सैयद रफिक (४९), शमिरा बानु मोहद्दीन शेख (४२) दोघे रा. चिता कॅम्प ट्रॉम्बे आणि दिलशाद आलम (४२) राहणार बांद्रा खेरवाडी अशा ८ जणांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी पत्रकारांना दिली.

मुलांना विकणारी टोळी – ही टोळी लहान मुलांना पळवून नेऊन त्यांची विक्री करत असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एका महिलेच्या माध्यमातून या टोळीसोबत व्हॉटस्अॅपवरुन मागील एक महिन्यापासून संपर्क ठेवला होता. या चॅटींगदरम्यान पोलिसांच्या पथकाने लहान मुल खरेदीबाबत चौकशी केल्यानंतर या टोळीने अडीच लाख रुपयांमध्ये नवजात बाळ विकत देण्याची तयारी दर्शविली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने लहान मुल विकत घेण्याची तयारी दर्शवून त्यांना खारघर येथे बोलावून घेतले होते.

पोलिसांनी लावला सापळा – मिळालेल्या माहितीआधारे पोलिसांनी सापळा लावला होता. यावेळी या टोळीतील मुमताज खान, रिक्षा चालक नदिम शाहिद अन्सारी आणि बाळाची आई मुमताज रहेमान मंडळ असे तिघेजण १७ दिवसांच्या बाळाला घेऊन रिक्षामधून खारघरमध्ये आले होते. यावेळी बाळाच्या खरेदी विक्रीचे अडीच लाख रुपये दिल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्यांची अधिक चौकशी केली. या बाळाच्या विक्री व्यवहारातील इतर पाचजण सहभागी असून सर्व मुंब्रा येथे असल्याची मिळाली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपास करण्यात येत आहे, अशी माहिती अतुल आहेर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक-अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष) यांनी पत्रकारांना दिली.

RELATED ARTICLES

Most Popular