रत्नागिरीमध्ये मागील आठवड्यापर्यंत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव जास्त प्रमाणात वाढला होता. रुग्ण संक्रमित होण्याचे दिवसाचे प्रमाण ५००-६०० च्या दरम्यान होते. आताही त्याच्यामध्ये विशेष असा फरक नाही आहे. ज्याप्रमाणे संक्रमीतांची संख्या वाढत आहे, त्याप्रमाणेच मृत्यू दरही वाढतच आहे. त्यामुळे कोविडच्या आजाराने मृत्युमुखी पडलेल्यांच्या डेथ ऑडीट करण्याचा निर्णय टास्क फोर्सने घेतला आहे.
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त राहिले आहे आणि त्यामध्ये तरुण रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले आहे. याची खोलवर माहिती किंवा कारणे जाणून घेण्यासाठी या सर्व मृत्यूंचे डेथ ऑडिट करण्याचा निर्णय कोविड-१९ जिल्हा टास्क फोर्स बैठकीत घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमधील २५ जणांच्या मृत्यूबाबत नेमकी लक्षणे, कारणे तसेच त्यांना असणाऱ्या सहव्याधी इत्यादींचा सखोल अभ्यास तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने करण्यात येणार आहे. त्याकरिता २२ जूनला आदेश जारी करण्यात आले.
भविष्यामध्ये तरुण रुग्णांवर योग्य उपचार करून मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी संशोधन करणारे हे डेथ ऑडिट अतिशय महत्वाचे असणार आहे. जिल्हा टास्क फोर्स समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांना जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टर याबाबत अभ्यास करून आपला अहवाल सादर करण्यात यावे असे आदेशात म्हटले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने १ हजार ६६७ जणांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यूदर २.८५ टक्क्यांवर आहे. शासन अनेकप्रकारे प्रयत्न करून सुद्धा मृत्यूदर कमी होण्याची काही लक्षणे दिसून येत नाही. त्यामुळे टास्क फोर्सच्या बैठकीत मृत्यूचे कारण शोधण्यासाठी डेथ ऑडिट करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.