28.6 C
Ratnagiri
Sunday, February 22, 2026

लांजातील चार गावांना वादळी पावसाचा तडाखा

महाशिवरात्रीनंतर थंडी गायब होऊन तापमानात वाढ झाली...

कोकणात १९८ जादा फेऱ्यांचे नियोजन शिमगोत्सव, होळीसाठी ‘लालपरी’ सज्ज

मुंबई, ठाणे परिसरात स्थायिक झालेल्या कोकणी बांधवांना...

रत्नागिरीच्या वैद्यकीय महाविद्यालयाला मिळणार ९.५ कोटींची ‘स्किल लॅब’

राज्यातील वैद्यकीय शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि भावी...
HomeRatnagiriकोल्हापूरहून परतताना भीषण अपघात संगमेश्वरच्या किराणा व्यापाऱ्याचा मृत्यू

कोल्हापूरहून परतताना भीषण अपघात संगमेश्वरच्या किराणा व्यापाऱ्याचा मृत्यू

गजेंद्र देशमुख गंभीर जखमी झाले व त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

कोल्हापूर – रत्नागिरी मार्गावर शुक्रवारी (दि. २० फेब्रुवारी) दुपारी सुमारे एक वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कसबा (ता. संगमेश्वर) येथील गजेंद्र शिवाजी देशमुख (वय ४४) यांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशमुख हे कोल्हापूर येथे किराणा माल खरेदी करून त्यांच्या ताब्यातील दुचाकी (क्रमांक एमएच ०८ बीए ९००५) वरून कसबा येथे परतत होते. दरम्यान, शाहू‌वाडी तालुक्यांतील वालुर गावच्या हद्दीत कचरे यांच्या बागेजवळ समोरून येणारी सुझुकी सुपर कॅरी (क्रमांक एमएच ०९ एफएल ९५०९) चालक तुकाराम शंकर माने (रा. वालूर, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) हा आपल्या ताब्यातील वाहन घेऊन येत असताना त्याने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली.

या भीषण धडकेत गजेंद्र देशमुख गंभीर जखमी झाले व त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी मृताचे वडील शिवाजी देशमुख यांनी शाहू‌वाडी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा क्रमांक ४६/२०२५ नोंदविण्यात आला असून भारतीय दंड संहिता कलम १०६(१), २८१, १२५ (अ) (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये तुकाराम माने यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल मुल्लानी करीत आहेत.

नियतीचा पुन्हा निर्दयी वार – २२ फेब्रुवारी २०२५ रोजी संगमेश्वर कसबा येथील गजेंद्र देशमुख यांची अवधी १४ वर्षांची, आठवीत शिक्षण घेणारी कन्या मृण्मयी हिने अभ्यासाच्या कारणावरून आईने रागावल्याच्या भरात टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपवली होती, त्या घटनेने संपूर्ण परिसर हळहळला होता. घरातील हास्य एका क्षणात विरून गेले होते. मुलीच्या अकाली जाण्याने देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. मुलीच्या जाण्यानंतरचे दिवस म्हणजे त्या कुटुंबासाठी एक न संपणारी वेदना होती. प्रत्येक सकाळ मृण्मयीच्या आठवणीने सुरू व्हायची आणि प्रत्येक रात्र तिच्याच आठवणीने डोळे पाणावून जायचे. तरीही गजेंद्र देशमुख यांनी मनाचा धीर करून संसाराची गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला होता. जणू काळाने पहिला घाव घातला होता, पण तो थांबला नव्हता जणू तो दबा धरूनच उभा होता. या दुर्दैवी घटनेला वर्ष पूर्ण होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना नियतीने पुन्हा एकदा निर्दयी वार केला.

RELATED ARTICLES

Most Popular