जिल्ह्यातील शिक्षकांची पदे रिक्त आहेत, ती, भरण्यासाठी प्रयत्न करा, अशी मागणी प्राथमिक शिक्षकसेनेतर्फे कोकण विभागी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याकडे करण्यात आली. कोकण विभागीय शिक्षक आमदार म्हात्रे रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या वेळी प्राथमिक शिक्षक सेनेतर्फे त्यांची भेट घेऊन विविध विषयांवर सकारात्मक चर्चा केली. विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात आमदार म्हात्रे यांची आढावा बैठक झाली. या वेळी शिक्षक बदली सहावा टप्पा सुधारणा करण्याची मागणी, रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षक पदे भरण्यासाठी निवेदन, केंद्रप्रमुख पदाला वेतनवाढ सेवा पुस्तके अद्ययावत करण्यासाठी देण्याबाबत निर्णय व्हावा, शिक्षकांची कॅम्पचे आयोजन करावे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना गटविमा त्वरित द्यावा, प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची प्रलंबित बिले अदा करावीत, पदोन्नती तत्काळ करावी यासारख्या अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
या वेळी उपस्थित असलेल्या शिक्षण विभागाला आमदार म्हात्रे यांनी प्रत्येक महिन्याला आढावा बैठक आयोजित करणार असल्याचे सांगितले. कार्यालयीन कामकाजाच्या प्रस्तावावर १५ दिवस मुदतीत काम न झाल्यास कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करण्यास विधानसभा सभागृहात लक्षवेधी करणार असल्याचे सांगितले. या वेळी उपस्थित प्राथमिक उपशिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, जिल्हाध्यक्ष शिक्षकसेना दिलीप देवळेकर, जिल्हाध्यक्ष मुख्याध्यापक , संघ विजय पाटील, शिक्षकसेना राज्य संपर्कप्रमुख राजेश जाधव, विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.