आगामी सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व धर्मांचे सण व उत्सव सलोख्याच्या वातावरणात साजरे करण्यासाठी प्रशासनासह जिल्हा पोलिसदल सज्ज झाले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ३४ पोलिस अधिकारी, ३०० पोलिस अंमलदार, २ दंगा काबूत पथक, १ शीघ्र कृतिदल, ३५० होमगार्डचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे तसेच १९ चेकपोस्ट वाहनांची तपासणी केली जाणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये शांतता व जातीय सलोखा सदैव अबाधित राखण्याकरिता रत्नागिरी जिल्हा पोलिसदलामार्फत पोलिस ठाणे स्तरावर मोहल्ला समिती, शांतता समिती, गावातील सर्व धर्मांचे प्रमुख व्यक्ती, समाजातील मान्यवर व्यक्ती तसेच ग्रामस्थांच्या बैठका घेण्यात येत आहेत. पोलिसांमार्फत या बैठकांमध्ये गोवंशाची अवैध वाहतूक होणार नाही याबाबत सूचना देण्यात येत आहेत.
रत्नागिरी पोलिसदलातर्फे जिल्ह्यामधील सर्व पोलिस ठाणे स्तरावर जनावरांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी, विविध ठिकाणी अचानक नाकाबंदी करण्यात येत आहे. गुरूवारी साजरी होणारी आषाढी एकादशी व बकरी ईद यासाठी जिल्हा पोलिसदलातर्फे खालीलप्रमाणे बंदोबस्त योजना आखण्यात आली आहे. जिल्ह्यात बंदोबस्तासाठी ३४ पोलिस अधिकारी, ३०० पोलिस अंमलदार, २ दंगा काबूत पथक, १ शीघ्र कृतिदल, ३५० होमगार्ड आणि १९ तपासणी नाक्यावर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील महत्वाच्या मंदिर, मशीद व मदरसा परिसरांमध्ये योग्य पोलिस बंदोबस्त नेमण्यात येणार आहे. जिल्ह्यात पोलिस ठाणे स्तरावर संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉईंट्स नेमण्यात आलेले आहेत.