कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह उभारणीसाठी निधी उपलब्ध व्हावा, तसेच समाजातील अन्य प्रश्नांसंदर्भात उद्योजक वसंत उदेग यांनी शिष्टमंडळासमवेत आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या वेळी अजित पवार यांनी कुणबी समाजाला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. चिपळूण तालुक्यातील कुणबी समाजातील विद्यार्थासाठी वसतिगृह आहे; मात्र, सध्या ते नादुरुस्त अवस्थेत आहेत. या वसतिगृहासाठी शासकीय निधीसह समाजाच्या अन्य प्रश्नासंदर्भात मंगळवारी कुणबी समाजाचे नेते उद्योजक वसंत उदेग यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. या वेळी अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
कुणबी समाजाच्या वसतिगृह इमारतीची दुरावस्था झालेली आहे. इमारत सुस्थितीत राहिल्यास तसेच तेथे आवश्यक सेवासुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिल्यास गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना ते सोयीचे ठरणार आहे. विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतिगृह असावे यासाठी कुणबी समाजातील पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे. या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी उदेग यांच्याकडून समाजाच्या कामकाजाबाबत माहिती जाणून घेतली. समाजाचे आणि देशाचे भवितव्य असणाऱ्या विद्यार्थी मग ते कोणत्याही समाजाचे असोत. आम्ही त्यासाठी सहकार्य करत आहोत, असे सांगून आम्ही सहकार्य करू, असे आश्वासन या वेळी उपमुख्यमंत्र्यांनी दिले. राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी कुणबी समाजाचे पदाधिकारी करत असलेल्या कामाचे कौतुक केले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, कुणबी समाजाचे नेते विलास खेराडे आदी उपस्थित होते.