दाभोळ ते पेढे हा जलमार्ग क्र. २८ मंजूर असून, दाभोळ बंदर विकसित झाले तर रो-रो वाहतूक, खाडी खोलीकरण, पर्यटन आणि चिपळूण व खेडच्या पूरनियंत्रणाला यश येईल तसेच शासनाला महसूलही मिळेल शिवाय कोकण रेल्वे कऱ्हाड येथे जोडल्यास त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अर्थकारण होईल. त्यासाठी शासनाने साडबनच्या धर्तीवर दाभोळ बंदर विकसित करावे, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात केली. विधानसभा आमदार निकम यांनी विविध मुद्दे सभागृहात मांडले. त्यात ते म्हणाले, दाभोळ हे ऐतिहासिक बंदर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारापासून दाभोळ बंदराला महत्त्व होते. दाभोळ बंदरातून पश्चिम महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये मालाची वाहतूक केली जात होती. त्यामुळे हे बंदर मध्यवर्ती आहे. केंद्र सरकारने दाभोळ ते पेढे जलमार्गाला परवानगी दिली आहे. त्याचा कोकण रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्गाला फायदा होईल. या ठिकाणी रो-रो सेवा सुरू करता येईल या दृष्टीने सकारात्मक विचार करून दाभोळ बंदर पूर्णक्षमतेने विकसित करावे, अशी मागणी त्यांनी केली.’
सोलरपंप योजनेचे जिल्हावार उद्दिष्ट ठरवल्यास कोकणातील शेतकऱ्यांना लाभ मिळेल. कोकणात सोलर कृषिपंपाऐवजी वीजपंप द्यावेत. रत्नसिंधू योजनेला पुन्हा गती मिळावी. त्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय, महिला सक्षमीकरण सुरू करावे. कसबा येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी शासनाने मोठा निधी दिला आहे. भव्य स्वरूपात हे स्मारक व्हावे. त्याच पद्धतीने चिपळूण तालुक्यातील अलोरे येथे कोयना प्रकल्पांतर्गत ५०० एकर जमीन पडून आहे, त्या ठिकाणी कोकणच्या मध्यवर्ती भागात व पश्चिम महाराष्ट्राजवळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य क्रीडासंकुल उभारावे, अशाही मागण्या त्यांनी केल्या आहेत. सध्या राज्यभरात हिंदी भाषा सक्तीचा विषय गाजत असताना शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे महत्त्वाचे आहे. गणित व इंग्रजीचे शिक्षक उपलब्ध नाहीत. विनाअनुदानित कॉलेजसाठी अनुदान धोरण लागू प्रलंबित आहे तसेच युतीच्या काळात भूमिपूजन झालेला चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्ग नव्याने उभारण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा व या रेल्वेमार्गाला गती मिळावी, अशाही मागण्या त्यांनी केल्या.
महामार्गाची कामे अपूर्ण – आमदार निकम यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या अपूर्णावस्थेकडे सरकारचे लक्ष वेधले. ते म्हणाले, ‘महामार्गाची कामे अद्याप अपूर्णच आहेत. या वर्षीही महामार्ग पूर्ण होईल की, नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे शासनाने समृद्धी महामार्ग पूर्ण करतानाच त्याच दर्जाचा मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण करावा. अपघाताच्या ठिकाणी सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाय करावा, अशी मागणी आमदार निकम यांनी केली.’