“आम्ही अन्य कुणाप्रमाणे कधीही उगाचच छाती पुढे काढून धमकावण्या देत, दमदाट्या करीत, कुटाळक्या करीत फिरलो नाही तर ज्या मतदार बंधू भगिनींनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांच्या भल्यासाठी सदैव कार्य केले. माझ्या खेड, दापोली, मंडणगड मतदार संघ ‘सुजलाम सुफलाम’ व्हावा, माझ्या मतदार बंधू भगिनींच्या हातात बक्कळ पैसा खेळावा व त्यांना ‘बरकत’ यावी यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत घेतली” असे आ. योगेश कदम यांनी विनम्रपणे नमूद केले. आ. योगेश कदम यांची विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दै. ‘रत्नागिरी टाइम्स’ तर्फे विशेष मुलाखत घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
सर्वात तरुण आमदार – आ. योगेश कदम हे केवळ रत्नागिरी जिल्हयातीलचनव्हे तर अवघ्या कोकणातील सर्वात तरुण व तडफदार आमदार म्हणून ओळखले जातात. त्यानी सांगितले, “गरीबांची दुःखे काय असतात याची मला पुरेपूर जाणीव आहे, आम्ही गरीबीचे चटके सोसले आहेत. म्हणूनच आम्ही कधी फुशारक्या मारीत फिरलो नाही तर माझ्या बंधू भगिनींच्या सहाय्यासाठी मी गावोगाव वणवण फिरलो, त्यांच्या दुःखावर फुंकर मारली व त्यांचे दुःख हलके करण्यासाठी त्यांना सहाय्य केले” अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली.
सर्व समाजांसाठी कार्य! – आ. योगेश कदम शांत चित्ताने बोलत होते. त्यांनी सांगितले, “कुणा ‘बोलघेवड्या’ पुढाऱ्याप्रमाणे उगाच टीका करीत फिरण्यात काही अर्थ नसतो. त्याऐवजी विधायक कार्यावर आम्ही भर दिला. समाजातील सर्व घटकांसाठी ‘आम्ही विधायक कार्य केले. मुस्लिम बांधव, कुणबी समाज, मराठा समाज तसेच अन्य विविध समाजांसाठी आम्ही प्राधान्याने कार्य केले” असे त्यांनी स्पष्ट केले.
धरणे व पाणी योजना – आ. योगेश कदम भरभरुन बोलत होते. त्यांनी सांगितले, “दापोली तालुक्यातील हर्णे येथील गोवा किल्ला पुर्नउभारणी, दापोली तालुक्यातील खेम धरण, मंडणगड तालुक्यातील चिंचाळी व भोळवली धरणे, खेड तालुक्यातील आंबवली, वडगाव बु. व शिवतर येथील लघु पाटबंधारे योजना मंजूर करुन मार्गी लावल्या आहेत”.
तलावांची कामे मार्गस्थ – “तसेच दापोली तालुक्यातील जामगे, पालगड (मळेकर वाडी), भडवळे येथील लघु पाटबंधारे व साठवण तलाव योजना, कादवण (ता. मंडणगड) तलाव, दापोली तालुक्यातील आंजर्ले, दाभोळ, सवेणी, शीरखल, शिळशिंगे तलाव तसेच मंडणगड तालुक्यातील दहागाव व विन्हे तलावांची कामे आम्ही निधी मंजूर करुन मार्गस्थ केली आहेत. लवकरच ती पूर्ण झालेली पहावयास मिळतील” असे त्यांनी सांगितले.
जनतेला उत्तम आरोग्य – आ. योगेश कदम उत्साहाने बोलत होते. त्यांनी सांगितले, “दापोली येथील उप जिल्हा रुग्णालय २०० बेडस्चे करणे तसेच दापोली तालुक्यातील वेळवी, आंजर्ले, जामगे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या सुधारणेसाठी करोडो रुपयांचा निधी आम्ही मंजूर करुन आणला व जनतेला उत्तम आरोग्य लाभावे यासाठी आम्ही प्राधान्य दिले” असे त्यांनी नमूद केले.
अगरबत्ती कारखाने – आ. योगेश कदम यांनी पुढे सांगितले, “भगिनींसाठी देखील आम्ही प्राधान्याने काम केले. दापोली येथे महिला बचत गट विक्री केंद्र व प्रशिक्षण केंद्र यांची तरतूद केली. तसेच दापोलीत जालगाव येथे अगरबत्ती कारखाना सुरु केला. त्यामुळे शेकडो महिलांना रोजगार मिळाला. खेड व मंडणगड येथेही महिला बचत गटांना अगरबत्ती कारखाने सुरु करुन देणार आहोत” असा त्यांनी विकास कार्याचा धावता आढावा घेतला.
सागरी पुलांना मंजुरी – आ. योगेश कदम विलक्षण तन्मयतेने बोलत होते. त्यांनी सांगितले, “सागरी महामार्ग पूर्ण होताच माझ्या मतदार संघात मोठी बरकत येईल हे ध्यानी घेऊन सागरी महामार्गावरील ४०९ कोटींचा बाणकोट (ता. मंडणगड) खांडी पूल, १४८ कोटींचा केळशी खाडी पूल (ता. दापोली) व दाभोळ खाडी पूल हे ३ मोठे पूल आम्ही मंजूर करुन आणले. त्यांचे काम आचारसंहिता संपताच सुरु होईल” असे त्यांनी स्पष्ट केले.
रस्ते विकास कार्यक्रम – आ. योगेश कदम यांनी तळमळीने विकास कार्यासाठी वाहून घेतले आहे. त्यांनी सांगितले, “हणे बंदराचा विकास (२२२ कोटी), लाटवण ते विसापूर (५५ कोटी), विसापूर ते दापोली (१४१ कोटी) व दापोली ते खेड (१३८ कोटी) असे मतदार संघातील ३ मुख्य रस्ते आता रुंद व उत्तम प्रतीचे होतील” असे त्यांनी यावेळी नमूद केले.
५० हजारांचे मताधिक्य – आ. योगेश कदम यांनी सडेतोडपणे सांगितले, “आम्ही सदैव जनतेसोबत राहिलो म्हणूनच आज जनता आमच्या सोबत आहे. करोनानंतर फक्त अडीच वर्षांचा काळ मिळाला व अल्पावधीत आम्ही भक्कम कार्य करुन दाखविले. या भक्कम विकास कार्याच्या बळावरच आम्ही ५० हजारांच्या दणदणीत मताधिक्याने विजयी होऊ व पुढील ५ वर्षांत सर्व विकास कामे पूर्णत्वास नेऊ” असा सार्थ आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.