“रत्नागिरी मतदार संघाचा ‘चौफेर’ व सर्वांगीण विकास करण्यासाठी कॅबिनेट मंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री ना. उदय सामंत हेच एकमेव सक्षम व कर्तबगार नेते आहेत. त्यांच्या हातूनच असा भक्कम विकास होणार आहे. म्हणूनच पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी त्यांना एकमताने आमदार व नामदार केले पाहिजे!” असे सडेतोड प्रतिपादन रत्नागिरी जि. प. चे भूतपूर्व अध्यक्ष श्री. जयसिंग तथा आबा घोसाळे यांनी केले. श्री. जयसिंग घोसाळे हे विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलत होते.
कैक विकास कामे सुरु – श्री. जयसिंग घोसाळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील एक धडाडीचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगितले, “रत्नागिरी मतदार संघात एकाच वेळी अनेक मोठमोठी विकास कामे सुरु आहेत. त्यासाठी शेकडो नव्हे हजारो कोटी रुपयांचा निधी आणावा लागेल. ही क्षमता या घडीला फक्त ना. उदय सामंत यांच्याकडेच आहे” अशा शब्दात त्यांनी सारे स्पष्ट केले.
सामंतांना पर्याय नाही! – श्री. जयसिंग तथा आबासाहेब घोसाळे हे रत्नागिरी जि. प. चे अध्यक्ष होते. अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत संपूर्ण जिल्ह्यासाठी त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लावली. त्यांनी सांगितले, “रत्नागिरी मतदार संघात ना. उदय सामंत यांच्या तोडीचा अन्य कुणी नेता नाही ही वस्तुस्थिती आहे. विकास कामांचा ‘आवाका’ प्रचंड आहे आणि ना. उदय सामंत यांना पर्याय नाही” अशा स्वच्छ शब्दात त्यांनी निर्वाळा दिला.
सोम्या गोम्याचे काम नाही! – श्री. जयसिंग घोसाळे हे एक स्पष्टवक्ते व सडेतोड स्वभावाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगितले, “कुणा सोम्या गोम्याला आणून काहीही होणार नाही. केवळ आमदार नव्हे तर नामदार होण्याची क्षमता हवी, तरच शासकीय निधी मोठ्या प्रमाणावर आणून येथील सर्व विकास कामे पूर्ण करता येतील” असे त्यांनी सांगितले.
आम्ही त्यांच्या पाठीशी ! – त्यांनी पुढे सांगितले, “ना. उदय सामंत यांची जनतेसाठी असलेली तळमळ, सचोटी व विकास कामांसाठी त्यांची सुरु असलेली अहोरात्र मेहनत ध्यानी घेऊन आम्ही सर्वांनी त्यांना साथ देण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार आम्ही सर्वांनी शिवसेनेत प्रवेश केला. आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत”.
एकमेव कर्तबगार नेता – “ना. उदय सामंत हेच या घडीला आमदार व नामदार होऊ शकतात आणि आपण त्यांना एकजुटीने व एकदिलाने निवडून दिले पाहिजे. केवळ ना. उदय सामंत हेच या घडीला असे एकमेव नेते आहेत की जे रत्नागिरी मतदार संघाचा ‘चौफेर’ विकास करु शकतात” अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली.