उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत अनेक जण जखमी झाले आहेत. ३७ जणांचा मृत्यू झाल्याची सायंकाळपर्यंत आकडेवारी समोर आली आहे. मात्र या शाही स्नानात १५ कोटी भाविक स्नान करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती आणि त्यामुळेच हा प्रकार भयानक आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात भाविक संगमावर आल्यानंतर काय प्रकार घडला असेल याची कल्पनाही करवत नाही. विशेष म्हणजे या भयानक प्रकाराची माहिती देशभरातील वृत्तवाहिन्या देण्यास तयार नसल्याने सारे चक्रावले आहेत.
सर्वांची थोबाडे बंद – महाकुंभमेळ्याच्या चेंगराचेंगरीत किती भाविक मरण पावले, किती जखमी झाले हे हिंदी व इंग्रजी वृत्तवाहिन्या सांगत नाहीत मात्र दिल्लीत कुठेतरी इमारत कोसळून २ मेले हे सांगत आहेत. कालची ही घटना होती. मात्र तरीही आज ती घोकत आहेत. सर्वांची थोबाडे बंद केल्याचे चित्र दिसत आहे. फक्त परिस्थिती नियंत्रणात आहे असे सरकारी म्हणणे आहे आणि तेच रेटून सांगत आहेत. महाकुंभमेळ्यासारख्या देशातील नव्हे तर संपूर्ण जगातील मोठ्या हिंदूंच्या सोहळ्यामध्ये एवढी मोठी दुर्घटना घडली आणि चॅनेलवाले गप्प का? सर्वांची थोबाडे बंद केली आहेत का? असा संतप्त सवालही जनतेतून व्यक्त होत आहे.
यांनी फोन लावला, त्यांनी फोन लावला – कुंभमेळ्यात नेमके किती जण जखमी आहेत हे सांगण्यापेक्षा परिस्थिती नियंत्रणात आहे. नरेंद्र मोदी यांनी तीनदा योगींना फोन केला ते लक्ष ठेऊन आहेत. अमित शहा यांनीही फोन केला. योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. आखाड्याच्या संतांशी चर्चा केली अशी भलतीच माहिती वृत्तवाहिन्या देत आहेत. यांनी फोन केला आणि त्यांनी फोन केला हे सांगण्यापेक्षा या दुर्घटनेत नेमके किती भाविक मृत्यूमुखी पडले, कितीजण या पृथ्वीतलावर शाबीत आहेत हे सांगणे गरजेचे आहे. प्रत्येक नातेवाईकांच्या मनाला हुरहूर लागून राहिली आहे याचे स्पष्टीकरण व्हायला हवे. ते होत नसताना भलतीच माहिती दिली जात असल्याने जनताही चक्रावली आहे. मृतांचा आकडा समजणे कठीण ज्या पध्दतीने देशभरातील प्रमुख वृत्तवाहिन्या विशेषतः हिंदी आणि इंग्रजी खरी माहिती देत नाहीत आणि भलतीच माहिती देत आहेत त्यामुळे बहुदा देशवासियांना यावर्षीच्या महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीत किती मृत्युमुखी पडले याचा खरा आकडा लोकांना समजणे कठीण आहे असेही आता बोलले जात आहे.
अमृतस्नान रद्द – दरम्यान मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास चेंगराचेंगरी झाल्याची घटना घडली आहे. त्यामळं आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी दिली आहे. आखाड्यांनी त्यांच्या मिरवणुकांना शिबिरांना माघारी बोलावण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथील कुंभमेळ्यातील दुसऱ्या अमृत स्नानाच्या म्हणजेच मौनी अमावस्येच्या पूर्वी चेंगराचेंगरी झाली. रात्री १ वाजताच्या सुमारास चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. जिथं लोक झोपली होती तिथं त्या ठिकाणी मागील बाजूनं लोक आले आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्याचवेळी लाखो लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं.
रुग्णवाहिकेने माहिती दिली – रुग्णवाहिका चालकांनी चेंगराचेंगरी झाली असल्याची माहिती दिली. सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं. दुसऱ्या घाटावर स्नान करायला ते तयार नव्हते. त्यामुळं एका ठिकाणी गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली. यानंतर पळापळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार १११ ते १२२ पोल नंबरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेतील जखमींना स्वरुप रानी नेहरु रुग्णात्यात पाठवण्यात आलं आहे.
लोक पळू लागले – ‘चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सातत्यानं जिथं चेंगराचेंगरी झाली आहे त्या संगम घाटावर कोणी जाऊ नये, असं आवाहन केलं आहे. संगम घाटावरुन लोकांना बाहेर काढण्यासंदर्भात प्रयत्न सुरु आहेत. घटनेच्या साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली.