देवरूख-पर्शरामवाडी जि. प. प्राथमिक शाळेत हवामान बदलाचे जागतिक संकट रोखण्याच्या उद्देशाने सृष्टीज्ञान संस्थेच्या वतीने संगमेश्वर तालुक्यातील पहिले शालेय मियावाकी वनउद्यान उभारले आहे. सह्याद्री वनउद्यान या नावाने उभ्या राहिलेल्या या मियावाकी वनवृक्ष उद्यानात २५ प्रकारच्या ३०० देशी वन वृक्षांची लागवड केली आहे. अकिरा मियावाकी या जपानी वनस्पती शास्त्रज्ञाने प्रचलित केलेल्या तंत्रानुसार जिल्हा परिषद शाळेत मियावाकी पद्धतीच्या वनउद्यानाची निर्मिती केली आहे.
येत्या सहा महिन्यांत या वन उद्यानाची प्रगती पाहून अशाच प्रकारच्या उद्यानांना जिल्ह्यात इतरत्र उभारण्याचा संकल्प आमदार शेखर निकम आणि देवरूख नगराध्यक्षा मृणाल शेट्ये यांनी व्यक्त केला. या उद्यानाच्या उभारणीसाठी शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण झोरे, शिक्षिका अनघा बोंद्रे, जोत्स्ना कांबळे, कांचन बसणकर, संजीवनी जाधव तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाराम लाड, सृष्टीज्ञान संस्थेचे वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक कुणाल अणेराव आणि डॉ. प्रताप नाईकवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी आमदार शेखर निकम, देवरुखच्या नगराध्यक्षा मृणाल शेट्ये आणि ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ संजीव अणेराव आदी उपस्थित होते.
या उद्यानाच्या निर्मितीसाठी डॉर्फ केटल कंपनी, नवदृष्टी संस्था, मुंबई यांच्याकडून सीएसआर निधी आणि ज्येष्ठ वनस्पतीतज्ज्ञ डॉ. नागेश टेकाळे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभले आहे. या वनउद्यानाचे स्थानिक पातळीवरील व्यवस्थापन सृष्टीज्ञान संस्था आणि सह्याद्री संकल्प सोसायटी पाहणार आहे. कोरोना महामारीच्या संकट काळातही योग्य काळजी घेत गेली. दोन वर्षे स्थानिक गावकरी, महिला, विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र मिळून या उद्यानाच्या निर्मितीसाठी अहोरात्र राबत होते. वाढते तापमान आणि कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण आटोक्यात ठेवणे, देशी वनस्पती वैविध्य राखणे आणि विद्यार्थ्यांसाठी एकाच जागी अनेक वनस्पतींच्या अभ्यासाचे जैविक दालन उभारणे हा या उद्यानाचा उद्देश आहे.