रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात सुरु असलेल्या नगर परिषद विभागामधील गटार बांधणीच्या निकृष्ट कामाबद्दल चुकीचा अहवाल सादर करण्यात आल्याने गोंधळ उडाला आहे. लांजातील गटाराच्या बांधकामाचा सदोष अहवाल ठेकेदाराला हाताशी धरून बांधकाम अभियंता यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर केला आहे. सदर अभियंता आणि ठेकेदार यांची काहीतरी मिलीभगत असल्याचा आरोप करीत हे काम चुकीच्या पद्धतीने होत असतानाही, काम योग्य प्रकारे करण्यात आल्याचा अहवाल सादर केल्याचा आरोप भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.
भाजपाचे तालुकाध्यक्ष महेश खामकर आणि गटनेते संजय यादव यांनी या कामाविरोधात उच्च न्यायालयात अपील करून या कामाला स्थगिती आणणार असल्याची माहिती यावेळी दिली. सदरच्या पत्रकार परिषदेला भाजपाचे शहराध्यक्ष प्रमोद कुरूप, नगरसेवक मंगेश लांजेकर आदी उपस्थित होते. घडलेल्या प्रकरणामध्ये प्रभाग क्रमांक १५ मध्ये सुभाष गुरव यांचे घर ते तुकाराम गुरव यांचे घर या ठिकाणी आठ लाख रुपये खर्च करून गटार बांधण्यात येत आहे.
नगर पंचायतीमधील भाजपाचे गटनेते संजय यादव यांनी हे काम हे इस्टिमेटप्रमाणे होत नसून ते निकृष्ट दर्जाचे होत असल्याने या कामाची सखोल चौकशी करून हे काम तत्काळ स्थगित करावे, अशी मागणी केली होती. यावर जिल्हाधिकारी यांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग लांजाचे अभियंता यांना या कामाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता प्रमोद भारती यांनी २८ जानेवारीला या कामाची पाहणी केली होती. यावेळी हे काम इस्टिमेटप्रमाणे होत नसल्याचे नगरसेवक संजय यादव यांना सांगितले होते. असे असतानाही बांधकाम अभियंता प्रमोद भारती यांनी जिल्हाधिकारी यांना काम योग्य प्रकारे होत असल्याचा खोटा अहवाल सादर केला असल्याचे नगरसेवक संजय यादव यांनी म्हटले आहे.